कोरोना विरुध्द लढतांनाच एकजुटीने विकास करू

कडकपणे राबवलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास अभूतपूर्व यश आले आहे. औरंगाबाद महानगरपालिका अँटीजेन चाचण्या करण्यात प्रथम क्रमांकावर असून इतर जिल्ह्यांसह देशात याचे अनुकरण करण्यात येत आहे. ही जिल्ह्यासाठी कौतुकाची बाब आहे.
subhash desai speech news aurangabad
subhash desai speech news aurangabad

औरंगाबाद : कोरोना विरोधातील लढाई आपण केवळ लढतच नाही, तर जिंकत देखील आहोत. कोरोनाचा सामना करतांनाच शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्यांच्या एकजुटीने जिल्ह्याचा विकासही साध्य करू, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी सर्व लक्ष केंद्रीत करत आरोग्य सुविधा, उपचार यासाठी प्राधान्याने निधीची उपलब्धता, जिल्हास्तरावर अधिकारांचे विकेंद्रीकरण करून या संकट काळात रूग्णाच्या जीवित संरक्षणासाठी आरोग्य यंत्रणाच्या सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचेही देसाई यांनी सांगितले.

देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त सुभाष देसाई यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतांना सुभाष देसाई म्हणाले, जिल्ह्यात आपण गेल्या चार महिन्यात गतिमानतेने आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली. आपल्या सर्व कोरोनायोद्ध्यांच्या अथक परिश्रमातून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढतच नाही तर जिंकतही आहोत.   महाराष्ट्र देशातील आघाडीचे व पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. 

जनकल्याणाच्या व्यापक भूमिकेतून सरकार कल्याणकारी योजना राबवत असून कोणत्याही नैसर्गिक तसेच इतर आपत्तीजनक संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी राहण्याचा कृतीशील प्रयत्न शासन जाणीवपूर्वक करत आहे. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून आपल्या देशाने अनेक क्षेत्रात अभूतपूर्व अशी प्रगती साधली आहे. मागासवर्गीयांची, समाजातील दीन-दुबळयांची उन्नती व्हावी, त्यांची आर्थिक प्रगती वेगाने होऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल व्हावेत म्हणून आपले शासन त्यांच्यासाठी विकासाच्या विविधांगी योजना कार्यक्षमपणे राबवित आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी), महानगरपालिकेचे रूग्णालये व अल्पावधित उभारलेले मेल्ट्रॉन कोविड रूग्णालय, इतर खासगी रूग्णालये तसेच  जनतेच्या उत्सफूर्त प्रतिसादाने कडकपणे राबवलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास अभूतपूर्व यश आले आहे. औरंगाबाद महानगरपालिका अँटीजेन चाचण्या करण्यात प्रथम क्रमांकावर असून इतर जिल्ह्यांसह देशात याचे अनुकरण करण्यात येत आहे. ही जिल्ह्यासाठी कौतुकाची बाब आहे.

महानगरपालिकेतर्फे "सेरो" सर्वेक्षण सुरू असून यास जनतेची साथ मिळत आहे. त्याचबरोबर कोरोना रूग्णांसाठी उपयुक्त ठरणारी प्लाझ्मा थेरपी तसेच मनपातर्फे राबवण्यात आलेली ‘डॉक्टर आपल्यादारी‘ हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.  मनपाने तयार केलेले ‘माझे आरोग्य माझ्या हाती‘ ॲप अनुकरणीय ठरले असल्याचेही देसाई म्हणाले.

कामगारांना रोजगार परत मिळाला

औरंगाबादमध्ये सहा हजार उद्योग सुरू झाले असल्याने कामगारांना त्यांचा रोजगार परत मिळाला आहे. यात औषधी उत्पादन, खाद्य पुरवठा, खाद्य प्रक्रिया इत्यादींचा समावेश आहे. या काळात गरिबांना आवश्यक अन्नधान्य मिळाले आहे. गरजूंना अल्प दरात जेवणाची सुविधा उपलब्ध करूण देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन हा उपक्रम खूप उपयुक्त ठरला. त्यामुळे जनसामान्य व कष्टकरी जनतेच्या शासन पाठिशी असल्याची जाणीव होत राहील.

या काळात कृषी विभागाने आरोग्य आपत्तीच्या काळातही मोठ्याप्रमाणात शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करण्यास हातभार लावला आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात फायदा झाला. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना, महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, कापूस खरेदी प्रकिया, पीक कर्ज आदीबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या काळात इ-लर्निंग उपक्रम राबविल्या जात असून लर्निंग फ्रॉम होम अंतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे.

कोरोना योद्ध्यांचे कौतुक

देसाई यांनी कोरोना योद्धे, घाटीच्या औषध विभाग प्रमुख डॉक्टर मिनाक्षी भट्टाचार्य, एमजीएमचे डॉ. आनंद निकाळजे, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या डॉ. पद्मजा सराफ, आरोग्य सेवक इसीजी तंत्रज्ञ प्रशांत फुलारे, परिचारिका ज्योती दारवंटे, राहुल वाटोरे, एमआयटी कोविड केअर सेंटरचे सफाई कामगार नरेंद्र घुमर, अक्षय वाघ आणि किलेअर्क कोविड केअर सेंटरचे कृष्णा हिवाळे व कोरोना आजारावर मात केलेल्या नागरिकांची प्रातिनिधिक स्वरूपात भेट घेऊन त्यांना प्रोत्साहित केले.

यावेळी स्वातंत्रसैनिक, खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय सिरसाट, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आदींची उपस्थिती होती. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com