यंदा भगवान भक्तीगड आपापल्या गावात आणून दसऱ्याचे सीमोल्लंघन करूया.. - Let's bring Lord Bhaktigad to our village this year and celebrate Dussehra. | Politics Marathi News - Sarkarnama

यंदा भगवान भक्तीगड आपापल्या गावात आणून दसऱ्याचे सीमोल्लंघन करूया..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

मुंडे साहेबांनी देखील तुमच्या जीवाला आणि आरोग्यालाच सर्वाधिक महत्व दिलेलं आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी ही पंरपरा जपली होती, त्यांची कन्या म्हणून माझी देखील तीच जबाबदारी आहे, आणि ती मी पार पाडेन. तुम्ही सर्वजण मुंडे साहेबांची आणि माझी शक्ती आहात. ही शक्ती कुठल्याही कारणाने क्षीण पावणार नाही याची काळजी मी घेणार आहे.

बीड ः गोपीनाथ मुंडे यांनी भक्ती आणि शक्तीचा संगम घालत भगवानबाबा गडावर सुरू केलेली दसरा मेळाव्याची पंरपरा यंदाही कायम राहणार आहे. पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जपण्याची पंरपरा देखील मुंडे साहेबांनी कायम जपली. ती जबाबदारी त्यांची व तुमची कन्या म्हणून माझ्यावर आहे. आणि म्हणून कोरोना सारखे महामारीचे संकट पाहता यंदाचा दसरा  मेळावा आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सावरगांवच्या भगवानगडावर गर्दीचे विक्रम न करता भगवानबाबांचा भक्तीगडच आपापल्या गावात आणून कार्यक्रमांची संख्या वाढवण्याचा विक्रम आपल्याला करायचा असल्याचे आवाहन माजी मंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे.

दरवर्षी भगवानबाबा गडावर दसरा मेळावा घेऊन विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केली होती. त्यांच्यानंतर कन्या पंकजा मुंडे यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. भगवानबाबांचे भक्त आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो, लाखो कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा उर्जा देणारा ठरत असतो. त्यामुळे या दसरा मेळाव्याचे वेगळेच महत्व आहे. गर्दीचे अनेक विक्रम या मेळाव्याने आतापर्यंत मोडले आहेत. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे भगवानबाबा गडावरील मेळाव्याचे स्वरुप बदलण्यात येणार आहे.

पंकजा मुंडे यांनी या संदर्भात सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या समर्थकांना आवाहन केले आहे. यात पकंजा मुडे म्हणतात, दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचा दौरा केला, त्यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी पाहिल्यावर भगवान गडावरील दसरा मेळाव्याला किती मोठ्या प्रमाणात लोक जमतील याचा अंदाज आला. कोरोना सारख्या संकटात एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करून तुम्हा सगळ्यांचा जीव मला धोक्यात घालायचा नाहीये. 

गोपीनाथ मुंडे साहेबांनी देखील तुमच्या जीवाला आणि आरोग्यालाच सर्वाधिक महत्व दिलेलं आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी ही पंरपरा जपली होती, त्यांची कन्या म्हणून माझी देखील तीच जबाबदारी आहे, आणि ती मी पार पाडेन. तुम्ही सर्वजण मुंडे साहेबांची आणि माझी शक्ती आहात. ही शक्ती कुठल्याही कारणाने क्षीण पावणार नाही याची काळजी मी घेणार आहे.  दसरा मेळावा तर होणारच, त्याच्या उत्साहात कुठल्याही प्रकराची कमतरता येणार नाही.

आतापर्यंत आपण भगवानबाबा भक्तीगडावर  संख्येचे अनेक विक्रम केले आहेत. मराठावाडा दौऱ्यात जो प्रतिसाद आणि गर्दी तुम्ही केली होती, ती पाहता गेल्यावेळच्या संख्येचा विक्रम देखील आपण नक्कीच मोडू याची मला खात्री आहे. पण यावेळी आपल्याला वेगळाच विक्रम करायचा आहे. दसरा मेळाव्या मी भगवान गडावर जाऊन बाबांच्या समाधीचे दर्शन घेणार आणि तुम्हाला मार्गदर्शनही करणार. पण यावेळी तुम्ही भगवान गडावर न येता भगवानबाबा गडच आपापल्या गावात घेऊन जायचा आहे.

कुठेल कार्यक्रम घ्यायचे, कसे घ्यायचे याचे वेळापत्रक लवकरच मी तुम्हाला सोशल मिडियाच्या माध्यमातून देईन. तर मग भक्ती आणि शक्तीचा हा अनोखा सोहळा यावेळी गावागावांत मोठ्या संख्येने साजरा करण्यासाठी सज्ज, व्हा आणि माझे आॅनलाईन मार्गदर्शन नक्की ऐका, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख