सरकार येऊ दे, मी मंत्री होतो, तुलाही आमदार करतो.. - Let the government come, I was a minister, I make you an MLA too | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार येऊ दे, मी मंत्री होतो, तुलाही आमदार करतो..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

हे सरकार आज पडेल, उद्या पडेल असे मी काही त्यात म्हटलेले नाही. जेव्हा केव्हा आमच्या पक्षाचे सरकार येईल तेव्हा मी मंत्री होईल असे मला म्हणायचे होते. याआधी मी राज्यमंत्री झालेलोच आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा मंत्री होईल, या भावनेतूनच मी ते बोललो होतो. तुला आमदार करीन हे देखील जसे इतर राजकीय पुढारी आपल्या समर्थकांना आश्वासन देतात, तसेच मी ही दिले.

औरंगाबाद ः हो सरकार येऊ दे, पडू दे, मी मंत्री होतो आणि तुलाही आमदार करतो हे मी म्हणालो. ते मी नाकारत नाही. पण कोणता राजकीय नेता किंवा पुढारी असे आश्वासन देत नाही. शेवटी मनुष्य हा आशेवर जगत असतो, तसा मी ही आशेवर आहे की, कधी तरी आमचे सरकार येईल आणि मी मंत्री होईल. डोके नावाचा माझा मित्र आहे, त्याला फोनवर बोलतांना मी हेच म्हणालो, तुलाही आमदार करतो असे त्या आॅडिओ क्लीपमध्ये आहे. यात चुकीच काय? असा सवाल करत भाजपचे विधान परिषदेतील आमदार सुरेश धस यांनी व्हायरल झालेल्या क्लीपचे समर्थन केले.

`सरकारनामा`ला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धस यांनी ऊसतोड मजुर, मुकदम, कामगार संघटनांच्या संप, आंदोलनापासून अनेक राजकीय विषयांवर आपले स्पष्ट मत मांडले. काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर धस यांची एक आॅडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यावरून मोठे वादंगही निर्माण झाले. यावर सुध्दा धस यांनी मनमोकळेपणाने चर्चा करत आपण क्लीपमध्ये जे आहे ते बोलल्याचेही सांगितले.

धस म्हणाले, व्हायलर झालेल्या क्लीपमधील विधानाचा मी इन्कार करत नाही. हो त्यामध्ये जे काही आहे, ती मी बोललोय. पण त्यात काही वाईट आहे असे मला वाटत नाही. डोके नावाचा एक मुलगा आहे, त्याच्याशी बोलतांना मी आपले सरकार येऊ दे, मी मंत्री झाल्यावर तुलाही आमदार करतो असे म्हटलो आहे. शेवटी माणूस हा आशेवर जगत असतो. प्रत्येक राजकीय नेता हा आपल्या कार्यकर्त्यांना मी तुला आमदार करतो, खासदार करतो, जिल्हा परिषद सदस्य करतो, असे आश्वासन देत असतो. मी दिले तर कुठे बिघडले, पण यावरून एवढी टिका करण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही.

हे सरकार आज पडेल, उद्या पडेल असे मी काही त्यात म्हटलेले नाही. जेव्हा केव्हा आमच्या पक्षाचे सरकार येईल तेव्हा मी मंत्री होईल असे मला म्हणायचे होते. याआधी मी राज्यमंत्री झालेलोच आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा मंत्री होईल, या भावनेतूनच मी ते बोललो होतो. तुला आमदार करीन हे देखील जसे इतर राजकीय पुढारी आपल्या समर्थकांना आश्वासन देतात, तसेच मी ही दिले. पण का कुणास ठाऊक त्या मुलाने ही क्लीप दिली, की फुशारकी म्हणून दिली आणि ती व्हायरल केली गेली, मला माहित नाही, असेही धस यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख