जयसिंगरावांच्या पक्ष सोडण्याने मनाला वेदना झाल्या... - Leaving Jaysingrao's party hurt my heart | Politics Marathi News - Sarkarnama

जयसिंगरावांच्या पक्ष सोडण्याने मनाला वेदना झाल्या...

जगदीश पानसरे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

भाजप सोबत ते कायम राहावेत अशी माझी इच्छा आहे, परंतु त्यांनी आता निर्णय घेतला असल्यामुळे यावर अधिक काय बोलावे? राहिला प्रश्न त्यांच्या राजीनाम्याने मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल का? तर मला वाटते त्याचा निवडणूकीवर काही परिणाम होणार नाही.

औरंगाबाद ः  जयसिंगराव गायकवाड यांनी शेवटपर्यंत भाजप सोबत रहावं अशी आमची इच्छा होती. मराठवाड्यात भाजप वाढवण्यामध्ये सुरुवाती्च्या काळात जयसिंगरांवाचा मोठा वाटा होता. इतकी वर्ष पक्षात काम केल्यानंतर त्यांनी अचनाक भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे मनाला वेदना झाल्या आहेत, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मतदान अवघ्या पंधरा दिवसांवर आले असतांना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. एवढेच नाही तर भाजप उमेदवार बोराळकर यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांचा प्रचार करणार असल्याचेही जाहीर केले.

या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, जयसिंगराव गायकवाड हे माझे सहकारी होते, पक्षात आम्ही अनेक वर्ष सोबत काम केले आहे. मराठवाड्यात भाजप वाढवण्यासाठी सुरवातीच्या काळात जयसिंगराव यांनी खूप मेहनत घेतली, पक्षासाठी त्याग केला. त्यामुळे त्यांनी अचनाक पक्ष सोडण्याचा घेतलेल्या निर्णय हा धक्कादायक आणि मनाला वेदना देणारा आहे.

भाजप सोबत ते कायम राहावेत अशी माझी इच्छा आहे, परंतु त्यांनी आता निर्णय घेतला असल्यामुळे यावर अधिक काय बोलावे? राहिला प्रश्न त्यांच्या राजीनाम्याने मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल का? तर मला वाटते त्याचा निवडणूकीवर काही परिणाम होणार नाही. भाजपने मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी शक्तीपणाला लावली आहे, त्यामुळे आम्हाला विजय निश्चित मिळेल, असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख