किल्लारी भूंकपात तारलंत, साहेब आताही तुमच्याकडूनच अपेक्षा.. - Killari survived the earthquake, sir, still expecting from you .. | Politics Marathi News - Sarkarnama

किल्लारी भूंकपात तारलंत, साहेब आताही तुमच्याकडूनच अपेक्षा..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

आजही किल्लारीचा भूकंप आठवला की, त्या काळात मुख्यमंत्री म्हणून तातडीने आपण या भागात धाव घेऊन लोकांना केलेली मदत, पुनर्वसनाचे काम कुणी विसरू शकत नाही. त्यामुळे या भागात जेव्हा केव्हा मोठे संकट येते तेव्हा भूकंप आणि त्यात तुम्ही केलेली मदत आठवल्या शिवाय राहत नाही.

तुळजापूर ः किल्लारीला झालेला महाप्रलयंकारी भूकंप आणि त्यानंतर या भागातील जनतेच्या पुनर्वसनासाठी आपण केलेले काम येथील लोक कधी विसरू शकत नाहीत. भूकंपात तारलंत तसंच अतिवृष्टीच्या या संकटातून साहेब तुम्हीच आम्हाला बाहेर काढाल, असा विश्वास लोकांना आहे. त्याच अपेक्षेने ते आपल्याकडे पाहत असल्याचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगत किल्लारीच्या भूकंपात तेव्हाचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी केलेल्या कामाची आणि मदतीची आठवण करून दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा भागात गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज सकाळी तुळजापूरात दाखल झाले.अनेक गांवात आणि शेतात जाऊन पाहणी केल्यानंतर उमरगा येथे शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना तातडीने मदत करण्या संदर्भात आश्वासन दिले.

यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी किल्लारी भुकंपाचे संकट आणि त्यावेळी शरद पवारांनी तत्परतेने केलेली मदत याचा दाखला दिला. निंबाळकर म्हणाले, अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठची शेतजमीन तर खरडून गेली आहे. कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे काही शेत जमीनीत तर पुढील काही वर्ष पीक येईल की नाही, अशी परिस्थिती आहे.

काही प्रमाणात घरांची देखील पडझड झाली आहे. त्यामुळे शेतकरी व ज्यांची घरे पडली त्यांना तातडीने मदत मिळावी, अशी या सगळ्याची अपेक्षा आहे. आजही किल्लारीचा भूकंप आठवला की, त्या काळात मुख्यमंत्री म्हणून तातडीने आपण या भागात धाव घेऊन लोकांना केलेली मदत, पुनर्वसनाचे काम कुणी विसरू शकत नाही. त्यामुळे या भागात जेव्हा केव्हा मोठे संकट येते तेव्हा भूकंप आणि त्यात तुम्ही केलेली मदत आठवल्या शिवाय राहत नाही.

आज अतिवृष्टीचे आलेले संकट तसेच आहे. आपत्ती व्यवस्थापनाची मदत फारशी मिळणार नाही, पण या भागातील ९० टक्के लोकांनी पीक विमा भरलेला असल्यामुळे या कंपन्यांच्या काही जाचक अटी शिखिल केल्या तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकेल. गेल्या वेळी काढून गंजी घातलेले सोयाबीन खराब झाले तेव्हा कापणी केलेल्या पिकाला विमा मिळणार नाही, ही अट कंपन्यांनी शिथील केली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सहाशे कोटींचा पीक विमा मिळाला होता. यावेळी अशी अट घातली नाही तर शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल, याकडेही निंबाळकर यांनी शरद पवारांचे लक्ष वेधले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख