Keep Reservation for Corona Warriors in Government Jobs Demands Amarsinh Pandit to Rajesh Tope | Sarkarnama

कोरोना योध्यांना नोकरभरतीत आरक्षण द्या : अमरसिंह पंडित

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 ऑगस्ट 2020

कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, सफाई कामगार यांना भविष्यात नोकरभरतीत अतिरिक्त गुणांसह आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

बीड : कोविड-१९ च्या पार्श्‍वभुमीवर कोरोनाच्या या संकट काळात कंत्राटी पध्दतीने काम करून स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणा-या कोरोना योध्यांना भविष्यातील शासनाच्या नोकरभरतीत आरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

सध्या कोविड-१९ च्या पार्श्‍वभुमीवर सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. राज्यभरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासन मोठ्या निधी, यंत्रसामुग्री, सुविधा उपलब्ध करुन देत आहे. मात्र, वाढत असलेल्या रुग्णसंख्येला मनुषबळ व तज्ज्ञांची कमतरता पडत आहे. त्यामुळे सरकारने डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, स्वच्छता कर्मचारी आदींची कंत्राटी पध्दतीने मर्यादीत काळासाठी नोकरभरती केलेली आहे. सदर सर्व कोरोना योध्दे या संकटकाळात जनतेला सेवा देताना सामाजिक जाणीवेचे भान ठेवून काम करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होवू नये यासह कोविड रुग्णांना उपचार देण्यासाठी स्वतःचा जीवन धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या हिताचा विचार होण्याची गरज असल्याचे अमरसिंह पंडित यांनी म्हटले आहे. 

त्यासाठी त्यांना शासनाच्या भविष्यकालीन नोकरभरतीमध्ये आरक्षण द्यावे. त्याचबरोबर नोकरभरतीसाठी लेखी आणि तोंडी परिक्षेत दहा अतिरिक्त गुण देण्याची तरतुद महाराष्ट्र शासनाने करण्याची मागणीही अमरसिंह पंडित यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

Edited By -  Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख