मराठवाडा पदवीधरच्या मैदानात जयसिंगराव गायकवाडांची पुन्हा उडी.. - Jaysingrao Gaikwad jumps again in Marathwada Graduate Ground .. | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधरच्या मैदानात जयसिंगराव गायकवाडांची पुन्हा उडी..

जगदीश पानसरे
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

मराठवाडा पदवीधर आपला होता, तो आपल्याच कडे परत येईल, हे ध्येय घेऊन मी आज निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेतला.आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने, मदतीने व प्रथम पसंतीच्या मताच्या सामर्थ्यावर मी ही निवडणूक नक्की जिकेल.यापूर्वीही दोन वेळा ती जिंकली आहेच. निवडणूक प्रचाराचा सर्व धर्मीय, सर्व पंथीय व अठरा पगड जाती जमातीचा अनुभवी संच ७६  तालुक्यात तयार असल्याचा दावाही गायकवाड यांनी केला.

औरंगाबाद ः मराठवा़डा पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचा उमेदवार कोण याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजपकडून गेल्यावेळी निवडणूक लढवलेले शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू असतांना अचनाकपणे दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी देखील मैदानात उडी घेतली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ आपला होता, तो आपल्याकडे परत आला पाहिजे, असे म्हणत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर पक्षाने मला उमेदवारी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी तिसऱ्यांदा मराठवाडा पदवीधर मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाने अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नसली तरी, त्यांची तयारी पहाता पक्षनेतृत्वाने त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडीमुळे त्यांचे पारडे जड आहे असे वाटत असतांनाच आता विक्रमी मतांनी विजय मिळवण्याचा विक्रम असलेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपकडून उमेदवारीवर दावा सांगितला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर त्यांच्या समर्थकांकडून प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या, अशी मागणी केली जात होती. यावर जयसिंगराव गायकवाड यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. आज मात्र त्यांनी थेट उमेदवारी अर्ज घेत आपणही निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे पक्षाला कळवले आहे. `सरकारनामा`शी बोलतांना जयसिंगराव म्हणाले, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा आहे, तो राष्ट्रवादीकडे गेल्याचे शल्य मला अनेक वर्षांपासून बोचते आहे. गेल्या निवडणुकीत देखील मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, पण नेत्यांनी माझ्या ऐवजी शिरीषला उमेदवारी दिली.

भाजपकडे हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणावा, अशी हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मी राजकारणात सक्रीय नसलो तरी गेल्या अनेक वर्षांचे माझे असलेले संबंध आणि संपर्क मी कायम ठेवलेला आहे. पदवीधरची निवडणूक कशी जिंकायची याचा मला अनुभव आहे, रेकाॅर्डब्रेक विजय माझ्या नावावर आहे, दोनवेळा मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असल्याने माझा पदवीधरांशी थेट संबंध आहे. याने इतकी नाेंदणी केली आणि त्याने तितकी केली, यावर निवडणूक जिंकता येत नसते. 

मराठवाडा पदवीधर आपला होता, तो आपल्याच कडे परत येईल, हे ध्येय घेऊन मी आज निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेतला.आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने, मदतीने व प्रथम पसंतीच्या मताच्या सामर्थ्यावर मी ही निवडणूक नक्की जिकेल.यापूर्वीही दोन वेळा ती जिंकली आहेच. निवडणूक प्रचाराचा सर्व धर्मीय, सर्व पंथीय व अठरा पगड जाती जमातीचा अनुभवी संच ७६  तालुक्यात तयार असल्याचा दावाही गायकवाड यांनी केला.

आता वाट फक्त भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर होण्याची आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्य व आशीर्वादाने माझी उमेदवारी नक्कीच जाहीर होईल यात शंका नाही. चला आपण सर्व जण मिळून हा मतदारसंघ आपल्याकडे पुन्हा खेचून आणूच आणू, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. गेली अनेक वर्ष राजकारणापासून दूर असलेले गायकवाड मराठवाडा पदवीधरच्या निमित्ताने पु्न्हा सक्रीय होत आहेत, की मग ही भाजपची धक्कातंत्राची खेळी आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख