जयसिंगरावांच्या राजीनाम्याने भाजप उमेदवाराची डोकेदुखी वाढणार.. - Jaisingrao's resignation will increase the headache of BJP candidate | Politics Marathi News - Sarkarnama

जयसिंगरावांच्या राजीनाम्याने भाजप उमेदवाराची डोकेदुखी वाढणार..

जगदीश पानसरे
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

पदवीधरांचे मोठे जाळे मी निर्माण केले आहे. ते माझे फिक्स डिपाॅझीट आहे, मला उमेदवारी मिळाली, तर निश्चितच हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्या ताब्यात येईल, असा दावा गायकवाड यांच्याकडून केला गेला. आता तर मी भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांना पाठिंबा देणार असल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

औरंगाबाद ः भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आज तडकापडकी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत खबळबळ उडवून दिली. पक्ष कुठीलच जबाबदारी देत नसल्याने या पक्षात राहून काय करू? असा सवाल करत गायकवाडांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून पुन्हा लढण्याची त्यांनी पक्षाकडे व्यक्त केलेली इच्छा आणि त्याला न मिळालेला प्रतिसाद हे गायकवाड यांच्या राजीनाम्याचे खरे कारण असल्याचे बोलले जाते. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

तीनवेळा खासदार, केंद्रात राज्यमंत्री, पदवीधरचे आमदार, राज्यात मंत्री अशी अनेक पद भुषवल्यानंतर गेली कित्येक वर्ष भाजपपासून दोन हात अंतर राखून असलेल्या जयसिंगरावांनी भाजपची साथ सोडली. बारा वर्षापासून पक्ष आपल्यावर कुठलीच जबाबदारी सोपवत नाही, मग मी पक्षात राहून काय करू, असा त्यांचा सवाल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अचनाक जयसिंगरावांना भाजपने तयारी करायला सांगितली. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जयसिंगरावांच्या वाढदिवासाचे निमित्त साधत त्यांना शुभेच्छा देत तयारीला लागा असे आदेश दिले होते.

युती होणार की नाही हे स्पष्ट होत नसल्याने जयसिंगरावांना देखील कमबॅक करण्याची ही संधी वाटली आणि त्यांनी तीन महिने संपुर्ण जिल्हा पिंजून काढला. गावागांवात जाऊन जुन्या, जाणत्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या भेटी घेऊन जोरदार मोर्चेबांधणी केली. पण शिवसेना-भाजपची युती झाली आणि त्यांची ही सगळी तयारी वाया गेली. तेव्हाही जयसिंगराव पक्षावर नाराज झाले होते.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे दोन टर्म प्रतिनिधित्व केलेले असल्याने जयसिंगरावांनी पदवीधर मतदारांची एक चागंली मोट बांधली होती. कालांतराने पक्षाने श्रीकांत जोशी, शिरीष बोराळकर यांनी संधी दिली. पैकी जोशी यांनी एकदा विजय मिळवला , तर बोराळकरांना पहिल्या निवडणूकीत अपयश आले आणि ते आता पुन्हा दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत.

उमेदवारी मागितली, पण..

भाजपकडून मराठवाडा पदवीधरचा उमेदवार कोण असेल याची जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा जयसिंगराव गायकवाडांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वतःच्या नावाची चर्चा घडवून आणली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागत तसे प्रयत्नही सुरू केले. पण पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांचीच वर्णी लागली नाही, तिथे पक्षापासून अलिप्त असलेल्या जयसिंगरावांना संधी कशी मिळणार?  आणि नेमके घडलेही तसेच.

गोपीनाथ मुंडे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे गेल्यावेळची मराठवाडा पदवीधर निवडणूक भाजपने सोडली होती, त्यामुळे बोराळकरांना पुन्हा एकदा संधी देत असल्याचे सांगत पक्षाने पुन्हा बोराळकरांच्या नावावर मोहर उठवली. या वरून राज्यात अजूनही फडणवीस यांचाच शब्द प्रमाण असल्याचे सिद्ध झाले. जयसिंगराव गायकवाडांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ते बंडाचे निशाण फडकावतात की काय? अशीही चर्चा सुरू झाली होती. पण उमेदवारी अर्ज मागे घेत त्यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देत टोकाचे पाऊल उचलले.

गायकवाडांच्या या धक्कातंत्राने मराठवाड्यात एकच चर्चा सुरू झाली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणण्यासाठी चंद्रकात पाटलांपासून सगळे नेते आणि पदाधिकारी कामाला लागले असतांना गायकवाडांच्या या राजीनाम्याने भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. आपण पक्षात सक्रीय नसलो तरी माझ्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत मी माणसं जोडली आहेत. कार्यकर्त्याच्या घरी पिठंल भाकरी खाऊन पुढे जाणारा मी माणूस आहे.

पदवीधरांचे मोठे जाळे मी निर्माण केले आहे. ते माझे फिक्स डिपाॅझीट आहे, मला उमेदवारी मिळाली, तर निश्चितच हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्या ताब्यात येईल, असा दावा गायकवाड यांच्याकडून केला गेला. आता तर मी भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांना पाठिंबा देणार असल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख