विमा कंपन्यांचे फोनच लागत नाही; भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.. - Insurance companies don't just need phones; BJP MLAs lodge complaint with CM | Politics Marathi News - Sarkarnama

विमा कंपन्यांचे फोनच लागत नाही; भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार..

गणेश पांडे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

मी वारंवार नुकसानीच्या संदर्भात पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांना बोलले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ज्या पध्दतीने  ज्यांनी विमा भरला त्यांना मदत मिळाली होती. त्याच पध्दतीने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे.
- मेघना बोर्डीकर, आमदार, जिंतूर विधानसभा मतदार संघ.
 

परभणी ः अतिवृष्टीमुळे जिंतूर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. नुकसानीपासून वाचण्यासाठी विमा तर काढला. विमा कंपनी सांगते नुकसान झाले की आम्हाला फोन करा, परंतू आता जेव्हा शिवारेच्या शिवारे वाहून गेली आहेत, तेव्हा नेमका या कंपनीचा फोनच लागत नाही हा प्रकार दुर्देवी आहे, अशी तक्रार जिंतूरच्या भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सोमवारी (ता.26) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 जिंतूर विधानसभा मतदार संघासह संपूर्ण परभणी जिल्ह्यातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडला आहे. पहिल्या टप्प्यात झालेला संततधार पाऊस व नंतरची अतिवृष्टी आणि पुर यामुळे शेतकऱ्यांची सर्वच पिके हातून गेली आहेत. या नुकसानीचा विमा मिळावा यासाठी संबंधीत विमा कंपण्यांनी त्यांच्या दुरध्वनी क्रमांकावर नोंदणी करण्याबाबत आवाहन केलेले होते. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसानीचा फटका बसू नये म्हणून स्वताच्या पिकांचा विमा काढला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीच्या नोंदी केलेल्या आहेत.

परंतू निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे बहुतांश शेतकरी आपली नोंद कंपनीकडे करू शकलेले नाहीत. त्यामुळे अश्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते की नाही या बद्दल शंका उपस्थित होत आहे. नुकसान भरपाई मिळणार नाही याची भिती निर्माण झाली असून शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.  जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे या नैसर्गीक आपत्तीत नुकसान झालले आहे. या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळणे आवश्यक असल्याचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी म्हटले आहे.

आमदार मेघना बोर्डीकर यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितत झालेल्या नुकसानग्रस्त आढावा बैठकीतही या मुद्यावर प्रकाश टाकला होता. संबंधीत विमा कंपन्यांना निर्देशीत करून नोंदणी न करु शकलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचेही पंचनामे करण्यात यावेत. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख