कांदा निर्यात बंदी हटवा, फलोत्पादन मंंत्र्यांचे कृषीमंत्र्यांना पत्र... - Immediate lifting of onion export ban, letter from Horticulture Minister to Agriculture Minister | Politics Marathi News - Sarkarnama

कांदा निर्यात बंदी हटवा, फलोत्पादन मंंत्र्यांचे कृषीमंत्र्यांना पत्र...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

राज्यात लॉकडाऊन असताना  शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती, पण केंद्राने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी  भुमरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

औरंगाबाद, : राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी तातडीने हटविण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यांना पत्र पाठवले आहे.

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा याकरिता हे पत्र पाठविण्यात आले आहे.

मोदी सरकारने कृषी सुधारणा विधेयक मंजुर केल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. एकीकडे शेतकरी हिताचे हे विधेयक असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने या आधीच घेतला होता.

त्या्मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे निर्यात बंदीमुळे नुकसान तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतातील पिके, फळबागा आणि शेत जमीन वाहून जाण्याचे प्रकार महाराष्ट्रात झाले आहेत. अशा दुहेरी संकटातून शेतकऱ्यांना काढण्याची मागणी हेत असतांना राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आता कांदा निर्यात बंदी हटवण्यासाठी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच पत्र पाठवले.

राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आता कुठेतरी बाजार सुरळीत होत होते. त्यातून अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असतांना केंद्र सरकारने अचानकपणे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असतांना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे. 

राज्यात लॉकडाऊन असताना  शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती, पण केंद्राने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी  भुमरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख