आज आवाहन करायला आलोयं, निकालानंतर विजयी सत्कार समारंभाला येईन.. - I have come to appeal today, after the result I will be able to address the victorious meeting. | Politics Marathi News - Sarkarnama

आज आवाहन करायला आलोयं, निकालानंतर विजयी सत्कार समारंभाला येईन..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

उद्धव ठाकरे यांनी देखील काल सतीश चव्हाण यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सतीश चव्हाण रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वास  सत्तार यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून सतीश चव्हाण यांनी मागील बारा वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या जोरावर ते विजयाची हॅट्रीक निश्चित साधतील, असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण यांच्या प्रचारार्थ सत्तार यांनी मराठवाड्यात दौरा सुरू केला आहे. त्याची सुरवात औरंगाबदमधून झाली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत असतांना सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, तीन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील त्यांच्या प्रचारार्थ मराठवाडा दौरा सुरू केला आहे.

या अतंर्गत सत्तार यांनी आज वाळूज येथील कै.दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालय, एमजीएम कॅम्पस, नवखंडा महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालय, फोस्टर डेव्हलपमेंट महाविद्यालय आदी ठिकाणी भेटी देऊन पदवीधर, प्राध्यापक, शिक्षकांशी संवाद साधला.

देवगिरी महाविद्यालयात आयोजित संवाद सभेत अब्दुल सत्तार म्हणाले, मराठवाड्यातील पदवीधरांच्या प्रश्नांबरोबरच शिक्षण, उद्योग, सिंचन, कृषी, क्रीडा आदी क्षेत्रातील प्रश्न  सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत आक्रमकपणे मांडून सरकारचे लक्ष वेधले. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली असून अनेक प्रश्नांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून तिन्ही पक्षाची ताकद आपल्याला मतांमधून दाखवून द्यायची आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल सतीश चव्हाण यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सतीश चव्हाण रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वास  सत्तार यांनी व्यक्त केला.  त्यांच्या विजयी सत्कार समारंभास आपण याठिकाणी पुन्हा येणार असल्याचेही अब्दुल सत्तार म्हणाले.  

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख