I come to Aurangabad twice a month, can you tell me now asks subhash desai | Sarkarnama

`महिन्यातून दोन वेळा मी औरंगाबादला येत असतो, आत्ता मला हे सांगता का?`

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

आदेशाअभावी कामे रखडली हे अधिकाऱ्यांना दहा महिन्यांनंतर आठवले का, असे पालकमंत्र्यांना सुचवायचे असावे. 

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र या निधीबाबत अद्याप शासनाकडून आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे महापालिका व रस्ते विकास महामंडळांकडे असलेली कामे सुरू झालेली नाहीत. याबाबत पालकमंत्री सुभाष देसाई यांना महापालिका अधिकाऱ्यांनी आठवण करून देताच ते भडकले. ‘महिन्यातून दोन वेळा मी औरंगाबादला येत असतो, आत्ता मला हा विषय सांगता का? ’ असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

रस्त्यांसाठी जाहीर झालेल्या १५२ कोटीच्या निधीतून एमआयडीसीने आपल्या हिस्याची सात कामे सुरू केली आहेत. मात्र महापालिका व रस्ते विकास महामंडळ निधी संदर्भातील आदेशाची वाट पाहत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामेही सुरू होऊ शकली नाहीत. बुधवारी (ता. १६) महापालिकेच्या विविध कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

यावेळी रस्त्यांचा विषय निघाला. शहरातील रस्त्यांसाठी शासनाने १५२ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. महापालिका, एमआयडीसी व रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत. महापालिकेच्या वाट्याला पन्नास कोटींची कामे आली आहेत, पण शासनाच्या नगर विकास खात्याने निधी बद्दलचा अध्यादेश अद्याप काढला नाही. त्यामुळे कामे सुरु करता येत नाहीत, असे पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी देसाई यांना सांगितले. त्यावर सुभाष देसाई भडकले. निधी देण्याचा निर्णय दहा महिन्यापूर्वी झाला आणि निधी बद्दलचा अध्यादेश अद्याप निघाला नाही, हे तुम्ही आत्ता सांगत आहात? अशा शब्दात पालकमंत्र्यांनी जाब विचारल्यामुळे प्रशासक व अधिकारी मात्र निरुत्तर झाले. 

हे पण वाचा : औरंगपुरा, भडकलगेट भागात हटविली अतिक्रमणे

महापालिकेची शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच असून, बुधवारी (ता. १६) औरंगपुरा भाजीमंडई परिसर, भडकलगेट, काझीवाडा येथे कारवाई करण्यात आली.

औरंगपुरा भागात बीओटी प्रकल्पाला अडथळा ठरणाऱ्या बांधकामासह इतर पाच अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाने मंगळवारी (ता. १५) जमीनदोस्त केली होती. त्यानंतर बुधवारी कारवाई सुरूच ठेवण्यात आली. भटकलगेट, काझीवाडा येथे काही जणांनी मुख्य रस्त्यालगत पत्र्याचे शेड टाकून नागरिकांच्या जाण्या-येण्याचा रस्ता बंद केला होता. त्यामुळे संबंधिताला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र अतिक्रमण काढून घेण्‍यात आले नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने आज कारवाई केली. औरंगपुरा येथील पिया मार्केट लगत एकाने खुल्या जागेत हॉट चिप्स नावाचे दुकान थाटले होते. हे दुकान निष्काशित करण्यात आले.

दुकानदाराला साहित्य काढून घेण्यासाठी एका दिवसाचा वेळ देण्यात आला होता. पण साहित्य काढण्यात आले नाही. त्यात प्रशासनाने जेसीबी लावून दुकान हटविले. याचवेळी महावीर भवनपाठीमागे अनधिकृत लोखंडी शेड काढण्यात आले. ही कारवाई प्रभारी अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख उपायुक्त रवींद्र निकम, पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, पोलिस निरीक्षक फईम हाश्‍मी, इमारत निरीक्षक सय्यद जमशिद, बी. पी. गवळी, मझहर अली, आर. एस. राचतवार, रवींद्र देसाई यांच्या पथकाने केली.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख