High Court cancels FIR against MLA Narayan Kuche | Sarkarnama

आमदार नारायण कुचे यांच्याविरुद्धचा तो गुन्हा रद्द

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

कुचे यांच्याविरुद्धचा गुन्हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरफायदा घेणारा आहे. असे निरीक्षणे नोंदवत खंडपीठाने गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले.

औरंगाबाद ः आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी रद्द करण्याचे आदेश दिले.

खंडपीठाने प्रकरणात सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. तक्रारदार डोंगरे यांनी मूळ तक्रारी ऐवजी वेगळ्याच स्वरूपाची तक्रार सादर करून कुचे यांना गोवण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या आदेशाचा दुरुपयोग केला. कुचे यांच्याविरुद्धचा गुन्हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरफायदा घेणारा आहे. असे निरीक्षणे नोंदवत खंडपीठाने गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले.

दीपक डोंगरे यांनी २ मार्च २०२० रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्‍यात एक महिला आक्षेपार्ह भाषेतील मेसेजेस व फोटो पाठवत असल्याची तक्रार दिली होती. पोलिस गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करीत असल्याने डोंगरे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ७ जुलै रोजी नव्याने सविस्तर तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात आली, त्यात बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांचेही नाव टाकण्यात आले. त्यानुसार मेसेज पाठवणाऱ्या महिले सोबतच आमदार नारायण कुचे व इतर एक यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा रद्द करावा म्हणून नारायण कुचे यांनी अॅड. देवदत्त पालोदकर यांच्या मार्फेत खंडपीठात याचिका सादर केली. डोंगरे यांनी राजकीय गैरफायदा घेण्यासाठी विनाकारण गुन्ह्यामध्ये नाव गोवले असल्याने गुन्हा रद्द करावा अशी विनंती कुचे यांच्यातर्फे करण्यात आली होती.

डोंगरे हे व्यवसायानिमित्त सख्खे मामा आमदार नारायण कुचे यांच्याकडे वास्तव्यास होते. त्यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार डोंगरेंनी कुचे यांना ४० लाख रुपये निवडणुकीसाठी दिल्याचे म्हटले होते. त्यावरून हा वाद पेटला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख