मराठवाडा पदवीधरमध्ये विजय मिळवून नाकर्त्या सरकारला शाॅक द्या... - Give a shock to the government by denying victory to Marathwada graduates | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधरमध्ये विजय मिळवून नाकर्त्या सरकारला शाॅक द्या...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

देशात नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा व इतर राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये जनतेने पुन्हा एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. मराठवाडा देखील भाजपच्याच पाठीशी आहे, हे या निवडणुकाच्या माध्यमातून दाखवण्याची संधी आहे. बोराळकर यांना विजयी करून मराठवाडा देखील भाजपच्या पाठीशी आहे हा विश्वास खरा करून दाखवा.

औरंगाबाद ः  गेली पंचवीस वर्ष भाजपमध्ये सर्वसामान्य जनतेची कामे करणारा, तरुण, तडफदार, उच्चशिक्षित, खेळाडू उमेदवार भाजपने मराठवाडा पदवीधर निवडूणकीत दिला आहे. शिरीष बोराळकर यांना पहिल्या पंसतीचे मत देऊन मराठवाड्यावर अन्याय करणाऱ्या नाकर्त्या सरकारला शाॅक द्या, असे आवाहन विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे. 

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रचार आता अंतििम टप्यात पोहचला आहे. १ डिसेंबर रोजी मतदान होणाऱ्या या निवडणुकीत बोराळकर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह मराठवाडा व राज्यातील पक्षाचे सगळेच नेते कामाला लागले आहेत. प्रत्यक्ष प्रचार सभा, बैठकांच्या माध्यमातून बोराळकर यांना पहिल्या पंसतीचे मत देऊन विजयी करा, असे आवाहन भाजपकडून केले जात आहे. नुकताच देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी औरंगाबादचा दौरा देखील केला होता.

फडणवीस यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील बोराळकरांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओ संदेशात फडणवीस म्हणाले, पदवीधर मतदारसंघातील शिक्षक, प्राध्यापक,तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपने दुसऱ्यांदा उच्चशिक्षित, खेळाडू असलेल्या शिरीष बोराळकरांना उमेदवारी दिली आहे. गेली पंचवीस वर्ष भाजपच्या माध्यमातून ते मराठवाड्यात काम करतायेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत आहेत.

देशात नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा व इतर राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये जनतेने पुन्हा एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. मराठवाडा देखील भाजपच्याच पाठीशी आहे, हे या निवडणुकाच्या माध्यमातून दाखवण्याची संधी आहे. बोराळकर यांना विजयी करून मराठवाडा देखील भाजपच्या पाठीशी आहे हा विश्वास खरा करून दाखवा, आणि या नाकर्त्या सरकारला शाॅक द्या, असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख