मलाही न्याय द्या, ढवळेंच्या पत्नीची मागणी; ओमराराजे म्हणाले सोक्षमोक्ष लावाच.. - Give me justice too, Vandana Dhawale reminded the Chief Minister of her promise | Politics Marathi News - Sarkarnama

मलाही न्याय द्या, ढवळेंच्या पत्नीची मागणी; ओमराराजे म्हणाले सोक्षमोक्ष लावाच..

तानाजी जाधवर
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

दिलीप ढवळे यांच्या शेतीच्या लिलावाबाबत नोटीस निघाली होती. याच अस्वस्थेतुन त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात अन्वय नाईक प्रमाणेच आपल्याला न्याय मिळावा, आणि पतीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वंदना ढवळे यांनी केली आहे.

उस्मानाबाद ः अन्वय नाईक यांच्याप्रमाणेच दिलीप ढवळे यांच्या आत्महत्त्या प्रकरणाचीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घ्यावी, अशी मागणी दिलीप ढवळे यांच्या पत्नी वंदनी यानी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. १२ एप्रिल रोजी ढवळे यांनी आत्महत्या केली होती, त्याच्या खिशामध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे व अन्य एकाचे नाव होते.

त्या दरम्यानच्या काळात लोकसभेची निवडणुक असल्याने हे प्रकरण राजकीय अंगानेही गाजले होते. या प्रकरणामध्ये १५ सप्टेंबर २०१९ रोजी खासदार ओमराजे यांच्यासह अनेकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र अजुनही त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केली नसल्याने तपासाबाबत वंदना ढवळे यांनी शंका उपस्थित केली आहे. शिवाय आत्महत्ता झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उस्मानाबादच्या प्रचार सभेत ढवळे कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आश्वासन दिले होते, याची आठवणही वंदना ढवळे यांनी करुन दिली आहे

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांकडून अटक झाल्यानंतर इकडे उस्मनाबादमधील एका प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. अन्वय नाईक सारखाचा आपल्यालाही न्याय मिळावा, अशी मागणी दिलीप ढवळे यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्याकडे केली आहे. दिलीप ढवळे यांच्या नावावर तेरणा कारखान्याने वसंतदादा बँकेकडुन कर्ज काढले होते, तीन लाखाच्या कर्जासाठी कारखान्याने हमी घेतली होती.

तेरणा कारखान्याने लेखी हमी देऊनही दिलीप ढवळे यांचे तेरणा कारखान्याकडे असलेली संपुर्ण रक्कम बॅंकेकडे जमा झाली नसल्याचे दिसुन आले होते. उर्वरित रक्कम तेरणा कडून भरली गेली नाही, असा आरोप ओमराजे व तेरणा कारखान्यावर होता. यामुळे दिलीप ढवळे यांच्या शेतीच्या लिलावाबाबत नोटीस निघाली होती. याच अस्वस्थेतुन त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात अन्वय नाईक प्रमाणेच आपल्याला न्याय मिळावा, आणि पतीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वंदना ढवळे यांनी केली आहे.

याबाबत खासदार ओमराजे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणात ४० लोकांना कर्जासाठी तेरणा कारखान्याने हमी घेतली होती. मात्र त्यातील ११ गुत्तेदारांनी काम केले होते, साहजिकच तेवढ्याच लोकांची रक्कम कारखान्याकडुन बँकेला भरण्यात आली होती. पण बँकेने ही रक्कम ४० लोकांच्या नावे समप्रमाणात खात्यावर टाकली. या प्रकऱणी बँकेशी भांडलो पण त्यानी ऐकले नाही. पुढे डीडीआर,जेडीआर ऑफीसमध्ये जाऊनही फायदा झाला नाही. सरतेशेवटी मी अकरा लोकांना घेऊन न्यायासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या प्रकरणातुन पळ काढायचा असता तर मी भांडायला यांच्याबरोबर गेलोच नसतो. दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येचे मलाही दुःख आहे, पण माझ्यावर व तेरणा कारखान्यावर लावलेले आरोप चुकीचे आहेत. या प्रकरणाचा लवकर तपास व्हावा हीच माझीसुध्दा मागणी आहे, अशी बदनामी मलाही सहन होत नाही, असेही ओमराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख