मराठवाडा पदवीधरांचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या चव्हाणांना पुन्हा संधी द्या.. - Give another chance to Chavan who is a good representative of Marathwada graduates | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधरांचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या चव्हाणांना पुन्हा संधी द्या..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

नेटसेटधारकांच्या प्रश्नासह त्यांनी मराठवाड्याच्या पाण्याचा, विना अनुदानित शाळा, महाविद्यालयांचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडले. मराठवाड्यात लाॅ युनिव्हर्सिटी आणण्यात देखील चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे पदवीधरांनी पुन्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,असे आवाहन देखील मुंडे यांनी केले.

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आताचे उमेदवार आणि गेली दोन टर्म म्हणजे बारा वर्ष या विभागाचे उत्तमरित्या प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण यांना पुन्हा काम करण्याची संधी द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी- शिवसेना आणि काॅंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना तिसऱ्यांदा विजयी करून बळ द्या, असेही पवार म्हणाले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. १ डिसेंबर रोजी मतदान होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडीने तिसऱ्यांदा सतीश चव्हाण यांना मैदानात उतरवले आहे.

सरकारमधील शिवसेना- राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन्ही पक्षांनी प्रचारात आघाडी घेत सतीश चव्हाण यांना विजयी करण्यासाठी थेट मतदरांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. मराठवाड्यातील शैक्षणिक संस्था, वित्तीय संस्था, हाॅस्पीटल, डाॅक्टर, वकील अशा सर्वच स्तरातील पदवीधरांशी संपर्क साधून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व नेते सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी आवाहन करतांना दिसत आहेत.

अजित पवार यांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून सतीश चव्हाण यांना विजयी करण्यासाठी आवाहन केले आहे. कोरोनावर मात केल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. त्यात पदवीधरची निवडणूक असल्याने त्यांनी सतीश चव्हाण यांनी गेल्या दोन टर्ममध्ये आपल्या विभागाचे उत्तम प्रतिनिधित्व केल्याचे सागंत, तिसऱ्यांदा त्यांना विजयी करा, असे आवाहन केले.

विकासात योगदान असलेला सच्चा उमेदवार - मुंडे

`सच का साथ, सबका विकास`, हे ब्रीद घेऊन तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले सतीश चव्हाण हे सच्चे उमेदवार असून त्यांचे मराठवाड्याच्या विकासात मोठे योगदान असल्याचे गौरवोद्दगार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उदगीर येथील पदवीधरांच्या मेळाव्यात काढले. फक्त पदवीधरांचेच नाही तर सिंचन, रोजगार, शेती या विषयावर देखील चव्हाण यांनी सभागृहात सातत्याने मराठवाड्याचे प्रश्न मांडले आणि ते सोडवूण घेतले.

नेटसेटधारकांच्या प्रश्नासह त्यांनी मराठवाड्याच्या पाण्याचा, विना अनुदानित शाळा, महाविद्यालयांचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडले. मराठवाड्यात लाॅ युनिव्हर्सिटी आणण्यात देखील चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे पदवीधरांनी पुन्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,असे आवाहन देखील मुंडे यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख