पंकजा मुंडेच्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा.. - Gather in the stomach of the opposition due to the popularity of Pankaja Munde | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडेच्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा..

दत्ता देशमुख
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

भगवान भक्तीगडावर कोणीही येऊ नये असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. मात्र, भगवान बाबांवरील असीम भक्तीने प्रेरित होऊन उस्फूर्तपणे भक्तगण त्या ठिकाणी जमा झाले, असेही भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले.
 

 

बीड : यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन ऑनलाइन दसरा मेळावा घेणार असल्याचे लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. गडावर कोणीही येऊ नये असे असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, भगवान बाबां वरील असीम भक्तीने प्रेरित होऊन उस्फूर्तपणे भक्तगण त्या ठिकाणी जमा झाले. स्वतः पंकजा मुंडे यांनी परवानगी घेऊन दर्शनाला गेल्या व ऑनलाईन मेळाव्याला मार्गदर्शन केले. परंतु राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला.

आज जिल्ह्यासह अनेक ठिकाणी 144 कलम व इतर नियमांचा भंग बिनधास्तपणे चालू असताना केवळ लोकनेत्या पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंद करून जाणीपूर्वक त्यांना अडचणीत आणण्याचा खटाटोप विरोधकांकडून केला जात आहे. पंकजा मुंडे यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठल्याचेही मस्के म्हणाले.

अतिवृष्टी नंतर सर्वत्र सत्ताधारी नेते पाहणीसाठी फिरले. त्यांच्या मागेपुढे शेकडो कार्यकर्ते फिरत होते. त्यावेळी मात्र अशा सत्ताधारी नेत्यांवर कोणताही गुन्हा नोंद करण्याचे धाडस झालेले नाही. पंकजा मुंडे यांची लोकप्रियता विरोधकांच्या डोळ्यात नेहमीच खूपते. ऑनलाइन मेळावा असतानाही उस्फूर्तपणे कार्यकर्ते जमा झाले. यात पंकजा मुंडे यांचा कोणताही दोष नाही, अथवा नियमांचा भंग करण्याचा हेतू नाही.

भगवान भक्ती गडावर झालेली गर्दी ही विरोधकांना आवडली नाही. त्यामुळे हा जळफळाट आहे. केवळ सूडबुद्धीने लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे. पंकजा मुंडे रस्त्यावर उतरल्यानंतर हजारो समर्थक आणि कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे रस्त्यावर येतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोणी कितीही आडकाठी आणली आणि कितीही गुन्हे नोंद केले तरी त्यांची लोकप्रियता कोणीही रोखू शकत नाही. 

पंकजा मुंडे यांचे नेतृत्व हे भक्कम व जनसामान्यांच्या हितासाठी अहोरात्र झटत असते. कोणत्याही संकटप्रसंगी पंकजा मुंडे यांची भूमिका व त्यांनी उचललेले पाऊल हे जनतेची काळजी घेणारे असते हे सिद्ध झाले आहे. त्यांच्याविषयी जनसामान्यांमध्ये आस्था आणि प्रेम असल्यामुळेच त्यांच्या मागे आज लाखो समर्थक व हितचिंतकांची ताकद उभी आहे याची जाणीव विरोधकांनी ठेवावी. अशा प्रकारे सूड बुद्धीची वागणूक देण्याचा प्रयत्न भविष्यात करू नये, असा इशाराही राजेंद्र मस्के यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख