पदवीधर निवडणुकीत भाजपला विजयी करत गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करा.. - Fulfill Gopinath Munde's dream by winning BJP in graduate elections | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधर निवडणुकीत भाजपला विजयी करत गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करा..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे यावा यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रयत्न सुरू केले होते. पण दुर्दैवाने त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि ही निवडणूक आपण काही मतांच्या फरकाने हरलो. पण आता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून, भाजपच्या हक्काचा हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणावा आणि बोराळकर यांना सर्वाधिक पहिल्या पंसतीची मते मिळवून द्यावीत.

औरंगाबाद ः  भाजपकडे असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपकडून खेचून आणण्यासाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी गेल्यावेळी शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली होती. पण मुंडे साहेबांचे अपघाती निधन झाले आणि भाजपने ही निवडणूक सोडली. उमेदवार, कार्यकर्ते कुणाचीच मानसिकता निवडणूक लढवण्याची नव्हती. पण साहेबांचे अपुर्ण राहिलेले स्वप्न बोराळकर यांना विजयी करून पुर्ण करा, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बीड व अंबाजोगाई येथील पदवीधरांच्या मेळाव्यात केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी काल बीडमध्ये मेळावा घेतल्यानंतर आज अंबाजोगाईत त्यांनी पदवीधरांशी संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा पुर्वीपासून भाजपचा होता, नंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसने तो ताब्यात घेतला.

हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे यावा यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रयत्न सुरू केले होते. पण दुर्दैवाने त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि ही निवडणूक आपण काही मतांच्या फरकाने हरलो. पण आता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून, भाजपच्या हक्काचा हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणावा आणि बोराळकर यांना सर्वाधिक पहिल्या पंसतीची मते मिळवून द्यावीत.

विरोधी पक्षाच्या आमदारांनी बारा वर्षात काहीच केले नाही, त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते भाजपच्या नेत्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत. पण पदवीधर मतदार यावेळी त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही, अंबाजोगाईतील प्रत्येक पदाधिकाऱ्याने किमान ५० पहिल्या पसंतीची मते बोराळकरांना मिळवून द्यावी, आणि विरोधकांचे डिपाॅझीट जप्त करण्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहनही पंकजा मुडे यांनी केले.

या मेळाव्यास प्रवीण घुगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, रमेश आडसकर, माजी आमदार केशवराव आंधळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

छावा क्रांतीवीर सेनेचा बोराळकरांना पाठिंबा...

शिरीष बोराळकर यांना समाजातील विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळत असून नुकताच छावा क्रांतीवीर संघटनेने त्यांना बिनर्शत पाठिंबा जाहीर केला. कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या छावा क्रांतीवीर संघटनेने विद्यमान आमदारांनी सत्तेत असताना आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले, भेटायला देखील वेळ दिला नाही, असा आरोप केला. 

आता संघटनेचे मराठवाड्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी हे  बोराळकरांच्या विजयासाठी सगळी शक्तीपणाला लावतील, अशी ग्वाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.आता कोणत्याही भुलथापांना बळी न पडता बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मतदान करून प्रचंड मताने विजयी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिरीष बोराळकर, खासदार डॉ. भागवत. कराड, छावा क्रांतीवीर संघटनेचे  प्रदेश अध्यक्ष राजेश मोरे, प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, प्रदेश शेतकरी आघाडीचे पंकज जराड, भाजपचे शहर अध्यक्ष संजय केणेकर, प्रमोद राठोड, धनंजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संघटनेने पाठिंब्याचे पत्र दिले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख