दानवेंना लोकसभेला पाडलं नाही तर नाव लावणार नाही; हर्षवर्धन जाधवांचे थेट आव्हान - former mla harshvardhan jadhav challenges bjp leader raosahaeb danve | Politics Marathi News - Sarkarnama

दानवेंना लोकसभेला पाडलं नाही तर नाव लावणार नाही; हर्षवर्धन जाधवांचे थेट आव्हान

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा राजकारणात येण्याची घोषणा करुन रावसाहेब दानवेंना थेट आव्हान दिले आहे.  

कन्नड : राजकारण सोडून शांत जीवन जगण्यासाठी मी पुण्यात गेलो होतो. पण तेथेही चुकीचे गुन्हे नोंदवून मला संपवण्याचा डाव खेळण्यात आला. यामुळे मी आता परत राजकारणात येणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांना पाडले नाही तर हर्षवर्धन नाव वापरणार नाही, असे आव्हान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड येथे मंगळवारी दिले. 

पुणे येथील कारागृहातून जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी जाधव यांनी सहकारी इशा झा यांच्यासह शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. या वेळी खासदार दानवे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पुण्याती घटनेत खासदार दानवे यांच्या दबावामुळे पोलिसांनी चुकीचा गुन्हा नोंदवला. मात्र, उच्च न्यायालयाने हा गुन्हा चुकीचा असल्याचे म्हटल्याने, मला जामीन मिळाला. याआधीही माझ्या विरोधात खासदार दानवे यांनी चुकीचा अॅट्रोसिटी गुन्हा दाखल केला होता.

मी वाद आणि भांडण नको म्हणून राजकारण सोडून शांततेत समाज कार्य करण्याचे ठरवले होते. मात्र, खासदार दानवे हे मला जगू देत नाही. त्यामुळे आता मी पुन्हा राजकारणात येणार आहे. रावसाहेब दानवेंना जालना लोकसभेत पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. येत्या 18 तारखेपासून मी पुन्हा राजकारणात येण्याची सुरुवात करणार आहे. त्यादिवशी तालुक्यात विजयी सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे जाधव यांनी सांगितले. 

जाधव त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यावर टीका करताना म्हणाले की, एखाद्या महिलेने तिच्या पतीशी वाद असल्यास त्याच्या विरोधात राजकारण केल्याचे मी पाहिले आहे. मात्र, एखाद्या महिलेने स्वत:च्या मुलाच्या विरोधात पॅनेल उभे केल्याचे मी बघितले नव्हते. कन्नड तालुक्यातील झळकणाऱ्या बॅनरवरून संजना जाधव यांची राजकीय इच्छा लपून राहिलेली नाही. पती कारागृहात असताना या महिलेने मुलाविरोधात पॅनेल टाकले. कशासाठी हा अट्टहास तर आमदारकीसाठी. तोंडाने मागितली असती तर देऊन टाकली असती. एवढा खटाटोप कशासाठी करायचा.

खासदार दानवे यांनी विधानसभेत मला पाडण्यासाठी तत्कालीन मंत्री लोणीकर यांच्या जावयाला उभे केले. त्यामुळे मी पडलो. निवडून आलेल्या आमदारांचा प्रशासनावर वचक नसल्याने तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, तहसिलदार कोणीच काही ऐकत नाही.त्यामुळे खासदार दानवे यांनी माझेच नाही तर तालुक्याचेही नुकसान केले आहे, असाही आरोप जाधव यांनी केला. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख