Maratha Arakshan jagran parishad news jalna
Maratha Arakshan jagran parishad news jalna

एसईबीसीच्या हक्काच्या आरक्षणवर लक्ष केंद्रित करा...

आजही सामाजिक निकषांवर आरक्षण दिले जावे, अशी आमची आग्रही भुमिका आहे.मराठा संघटनानी अन्य आरक्षणाच्या मागे न लागता केंद्रातील शिक्षण व नोकर्‍यांतून दहा टक्के आरक्षण मिळेल, यासाठी पाठपुरावा करावा.

जालना : मराठा समाजास बहुजन समाजासोबत मुख्य प्रवाहात आणायचे आहे. ओबीसी आरक्षण, इडब्लूएसच्या भानगडीत न पडता मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे आयोगाने मान्य केले असून आता पुर्णपणे एसईबीसीचे हक्काचे आरक्षण टिकविणार्‍यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे मत भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयातील वकिलांवर आपला पुर्ण विश्‍वास आहे. तथापि मंगळवारी (दि.२७) होत असलेल्या सुनावणीसाठी राज्याचे संबंधित अधिकारी दिल्लीत पोहचले का? अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक घेऊन सर्व नियोजन केले का?असे प्रश्‍न उपस्थित करत दगाफटका झाला तर आम्ही उत्तर देऊ, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीने  मातोश्री लॉन्स येथे सोमवारी (ता.२६)  मराठा आरक्षण जागर परिषदेत खासादर संभाजीराजे छत्रपती बोलत होते. यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील , माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राजेंद्र दाते ,संजीव भोर, डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. संजय लाखे पाटील, सुनिल आर्दड,  राजेश राऊत, अभिमन्यु खोतकर, विष्णू पाचफुले, अ‍ॅड. अभिजीत पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करतांना खासदार संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी अनुसूचीत जाती, जमाती मागासवर्गीय घटकांसोबत मराठा समाजासह आरक्षण दिले होते. आजही  सामाजिक निकषांवर आरक्षण दिले जावे, अशी आमची आग्रही भुमिका आहे. मराठा संघटनानी अन्य आरक्षणाच्या मागे न लागता केंद्रातील शिक्षण व नोकर्‍यांतून दहा टक्के आरक्षण मिळेल, यासाठी पाठपुरावा करावा.

१९६७ पर्यत मराठा, माळी, तेली हे समुह आरक्षणात होते. १९६८ ला मराठा समाजास बाहेर काढण्यात आले,  ही लढाई अद्यापही  सुरू आहे. १०२ व्या घटनादुरूस्तीवर भाष्य करून आरक्षण मिळेपर्यत आपण मराठा समाजसोबत आहोत. उद्या समाज मुख्य प्रवाहात आल्यानंतर अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय बांधव माझेच असून त्यांच्यासाठी आपणास काम करायचे आहे. अशी भुमिकाही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता यांच्याशी आपली चर्चा झाली असून  मराठा आरक्षणासाठी दिल्लीत भगवा फडकवायचा तर काटेकोर निरीक्षण व नियोजन व्हायला पाहिजे, पुन्हा पाणीपत नको, अशी अपेक्षा देखील संभाजीराजे यांनी व्यक्त केली. सारथी संस्थेस दिड हजार कोटीचा निधी द्यावा, सन २०१९-२० वर्षात पात्र ठरलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देऊन रूजू करावे. राज्यात ओला दुष्काळ जाहिर करून केंद्राकडून मदत मिळवावी, अशी मागणीही संभाजीराजे यांनी यावेळी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com