पंकजा मुंडे यांच्यासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल.. - Fifty people including Pankaja Munde have been booked | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे यांच्यासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

सुधीर एकबोटे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

सावरगावात मेळावा नसूनही पंकजा मुंडे येणार असल्याने शेकडो समर्थक त्याठिकाणी जमले होते. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू आहेत, असे असताना देखील त्याठिकाणी गर्दी जमल्यामुळे अंमळनेर पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला.

पाटोदा : तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसऱ्याच्या दिवशी गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, राज्यसभा सदस्य भागवत कराड, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनीका राजळे व इतर ५० जणांवर रविवारी रात्री पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी मागील तीन  वर्षांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या दसरा मेळावा घेतात. प्रती वर्षी या मेळाव्यास लाखोंच्या संख्येने त्यांच्या समर्थकांची गर्दी असते . यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा ऑनलाइन होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

त्यानुसार रविवारी पंकजा यांनी सावरगावात येऊन भगवान बाबांचे दर्शन घेत सावरगावातूनच आपल्या समर्थकांना ऑनलाईन संबोधित केले. परंतु सावरगावात मेळावा नसूनही पंकजा मुंडे येणार असल्याने शेकडो समर्थक त्याठिकाणी जमले होते. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू आहेत, असे असताना देखील त्याठिकाणी गर्दी जमल्यामुळे अंमळनेर पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला.

जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी किसन सानप यांच्या तक्रारी वरून पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनीका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता गोल्हार, पाटोदा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे यांच्यासह इतर ५० जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Editd By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख