भिती व्यक्त केली आणि तसेच घडले.. ही आत्महत्या नाही तर हत्याच...

साडेतीन महिने उलटून गेल्यानंतरही खिडक्यांना ग्रील बसवले गेले नसतील तर काकासाहेब या तरुणाने आत्महत्या केली नाही, तर ती हत्या आहे असे मी मानतो. वेळीच लक्ष देऊन ग्रील बसवले असते तर या तरूणाचा जीव वाचला असता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून ज्यांनी कुणी या बाबतीत हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
Mp imtiaz jalil angry news aurangabad
Mp imtiaz jalil angry news aurangabad

औरंगाबादः  शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (घाटी) सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या इमारतीतून एका कोरोना रुग्णाने उडी घेऊन आत्महत्या केली. पण याला मी आत्महत्या मानत नाही, तर घाटी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा हा बळी आहे, हत्या आहे असे मी मानतो. तीन महिन्यापुर्वी सुपर स्पेशालिटी इमारतीची पाहणी केली तेव्हा खिडक्यांना ग्रील नसल्याचे निदर्शनास आणून देत यामुळे एखादी दुर्घटना किंवा आत्महत्येसारखा प्रकार घडू शकतो अशी भिती मी व्यक्त केली होती. दुर्दैवाने ती काल खरी ठरली, वेळीच ग्रील बसवले असते तर या तरुणाचा बळी गेला नसता असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी दोषींवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या बैठकीत केली.

घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीत कोरोनावर उपचार घेत असलेल्या पैठण तालुक्यातील काकासाहेब कणसे या तरुणाने रविवारी चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. या प्रकाराने घाटी प्रशासन आणि संपुर्ण शहर हादरले. घाटीतून कोरोना रुग्ण पळून जाण्याचे प्रकार काही दिवसांपुर्वी घडले होते.

मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसचा पदाधिकारी असलेल्या ४२ वर्षीय कोरोना रुग्णाने इमारतीच्या मोकळ्या जागेत उडी घेऊन आपले जीवन संपवल्याने या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

इम्तियाज जलील म्हणाले, तीन-चार महिन्यापुर्वी मी विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर व घाटीतील अधिकाऱ्यांसह सुपर स्पेशालिटी इमारतीची पाहणी केली होती. तेव्हा इमारतीमधील खिडक्यांना ग्रील नसल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हाच केंद्रकरांकडे मी तातडीने ग्रील बसवण्याची मागणी केली. खिडक्यांना ग्रील नसतील तर एखादी दुर्घटना किंवा आत्महत्ये सारखा गंभीर प्रकार घडू शकतो, अशी भिती व्यक्त केली होती. याचे गांभीर्य ओळखून विभागीय आयुक्तांनी देखील घाटीच्या अधिकाऱ्यांना खिडक्यांना ग्रील बसवण्यच्या सूचना दिल्या होत्या.

पण साडेतीन महिने उलटून गेल्यानंतरही खिडक्यांना ग्रील बसवले गेले नसतील तर काकासाहेब या तरुणाने आत्महत्या केली नाही, तर ती हत्या आहे असे मी मानतो. वेळीच लक्ष देऊन ग्रील बसवले असते तर या तरूणाचा जीव वाचला असता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून ज्यांनी कुणी या बाबतीत हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या रेमडीसेविरचा काळाबाजर सुरू असल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला. वेगवेगळ्या किंमतीत हे इंजेक्शन विकले जात आहे, त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. रुग्णांची फरफट थांबावी आणि इंजेक्शन योग्य किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी ही इंजेक्शन अन्न-औषध प्रशासनच्या देखरेखी खाली एकाच ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून रुग्णाच्या नातेवाईकांना शहरभर फिरावे लागणार नाही.

पण याला काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील असमर्थता दर्शवल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेऊन मास्कशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com