राजीनाम्यानंतरही भाजपकडून जयसिंगराव गायकवाड बेदखलच... - Even after resignation, Jaysingrao Gaikwad was evicted from BJP | Politics Marathi News - Sarkarnama

राजीनाम्यानंतरही भाजपकडून जयसिंगराव गायकवाड बेदखलच...

जगदीश पानसरे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

गायकवाडांच्या बंडाची दखल राज्यातील नेते घेतील आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा काल दिवसभर व्यक्त केली जात होती. मात्र चोवीस तासानंतरही असे काहीच घडले नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गायकवाडांचा राजीनामा मंजुर केला का? हे देखील स्पष्ट झाले नाही. परंतु ज्या पक्षाने दहा-बारा वर्ष आपल्याला वाळीत टाकले, त्या पक्षाकडून आपल्याला काही विचारणा होईल, अशी अपेक्षाही नव्हती, आणि घडलेही तसेच.

औरंगाबाद ः ऐन मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या काळात भाजपचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती. दहा वर्षापासून पक्ष माझ्याकडे हुंगूनही पहायला तयार नाही, असा आरोप करत जयसिंगरावांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला. चोवीस तास उलटून गेले तरी भाजपच्या राज्यातील एकाही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. दहा वर्षापासून भाजपकडून बेदखल करण्यात आलेल्या जयसिंगरावांना राजीनामास्त्रा नंतरही पक्षाने बेदखलच केल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची काल अंतिम मुदत होती. औरंगाबाद विभागातून निवडणूक लढवण्याची इच्छा जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून व्यक्त केली होती. तसे प्रयत्नही त्यांनी केले, पण पक्षाने बोराळकर यांना पुन्हा संधी दिली. उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी तरी पक्षाकडून कुणी संपर्क साधेल असे वाटत असतांना भाजपच्या एकाही नेत्याने गायकवाड यांना साधा फोनही केला नाही.

अखेर संतापलेल्या गायकवाडांनी पक्षाकडून आपल्याला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा ठपका ठेवत सकाळी दहाचा मुहूर्त साधच भाजपचा राजीनामा दिला. दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेत थेट महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना बळ देण्यासाठी प्रचाराला फिरणार असेही जाहीर केले.

गायकवाडांच्या बंडाची दखल राज्यातील नेते घेतील आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा काल दिवसभर व्यक्त केली जात होती. मात्र चोवीस तासानंतरही असे काहीच घडले नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गायकवाडांचा राजीनामा मंजुर केला का? हे देखील स्पष्ट झाले नाही. परंतु ज्या पक्षाने दहा-बारा वर्ष आपल्याला वाळीत टाकले, त्या पक्षाकडून आपल्याला काही विचारणा होईल, अशी अपेक्षाही नव्हती, आणि घडलेही तसेच.

मला जाब विचारण्याची कुणात हिमंत नाही..

या संदर्भात सरकारनामाशी बोलतांना जयसिंगराव गायकवाड म्हणाले, मी भाजपचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिला, त्यामुळे माझ्यासाठी आता तो विषय संपला आहे. त्यामुळे कुणी माझ्याशी संपर्क साधावा, माझी समजुत घालावी ही अपेक्षाच मी ठेवलेली नाही. सध्या भाजप २५ फुट उंचावरून चालतो आहे, त्यांना खालचं काही दिसतच नाही. त्यामुळे माझी समजुत काढावी, किंवा जाब विचारावा एवढी कुणाचीही हिमंत नाही.

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण हे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकतात, त्यामुळे त्यांना बळ देण्यासाठी मी प्रचाराला बाहेर पडलो आहे. आता एक तारखे शिवाय औरंगाबादेत परतणार नसल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख