गोपीनाथ मुंडेच्या काळात ऊसतोड संघटनांचा दबदबा; आता तो राहिला नाही.. - The dominance of sugarcane organizations during the time of Gopinath Munde; He is no more | Politics Marathi News - Sarkarnama

गोपीनाथ मुंडेच्या काळात ऊसतोड संघटनांचा दबदबा; आता तो राहिला नाही..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

माझा पंकजा मुंडे यांच्याशी अजूनही संवाद आहे, ऊसतोड कामागरांचे आंदोलन आणि राज्यभरातील दौरे या दरम्यान देखील माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते. कोरोना संकटानंतर नऊ महिन्यांनी त्या जिल्ह्यात आल्या तेव्हा त्याचे स्वागत करणारा मेसेज देखील मी पाठवला होता. नजीकच्या काळात माझे त्यांचे बोलणे नसले तरी संधी मिळेल तेव्हा मी त्यांच्याशी बोलेन, असेही धस यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद ः दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात ऊसतोड कामगार, मुकादम संघटनांचा साखर संघात दबदबा होता. त्यामुळे मुंडे साहेबांनी जी दरवाढ किंवा निर्णय ठरवला त्याच्यापेक्षा कमी कधी मिळाले नाही. मी तो काळ पाहिला आहे, पण आता परिस्थीती बदलली आहे, ऊसतोड कामागार संघटित नसल्याचा फायदा कारखानदार उचलत आहेत, त्यामुळेच १४ टक्क्यांची मजुरीत दरवाढ देण्याचा निर्णय घेऊन या कष्टकरी ऊसतोड मजुरांची चेष्टा करण्यात आल्याचा घणाघात आमदार सुरेश धस यांनी `सरकारनामा` ला दिलेल्या मुलाखतीत केला.

राज्यातील ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतुकदारांच्या मजुरी आणि कमिशमध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी संबंधित संघटनांनी संप पुकारला होता. ऊसतोडणीचा काळ असल्याने हा संप अधिक चिघळू नये यासाठी सगळ्या संघटना व त्यांच्या प्रतिनिधीची बैठक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काल पुणे येथे साखर संघाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी ऊसतोड मजुरांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये अर्ध्या टक्के वाढीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी देखील घडल्या. या पार्श्वभू्मीवर सुरेश धस यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.

धस म्हणाले, ऊसतोड कामगारांचे मजबुत संगठन निर्माण व्हावे, या भूमिकेतून मी पक्षाच्या आदेशानूसारच राज्याचा दौरा केला होता. यामागे कुणावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न किंवा ऊसतोड कामगारांचे नेतृत्व आपल्याकडे घेण्याचा माझा प्रयत्न नव्हता. आमचे प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानूसार मी काम केले. माझ्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील याची कल्पना होती.

तेव्हा त्यांनी देखील कुठल्या प्रकारचा आक्षेप घेतला नाही. ऊसतोड कामगारांसाठी राज्यभरात किंवा बीड जिल्ह्यात मी जे कार्यक्रम घेतले ते दिंवगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब आणि आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या फोटोशिवाय झाले नाहीत. त्यामुळे मी कुठे दुसरे नेतृत्व उभे करतोय, आणि पंकजा मुंडेचे झुगारतोय या चर्चांमध्ये काही तथ्य नाही.

गोपीनाथ मुडे साहेबांच्या काळात लवाद असो की साखर संघ, तिथे ऊसतोड मजुर, कामगार, मुकादमांच्या संघटनाचा एक वेगळाच दबदबा होता. दुर्दैवाने तो आता राहिला नाही, हे मान्यच करावे लागेल.  तो जर असता तर आज आमची १४ टक्के वाढ देऊन बोळवण केली गेली नसती. विशेष म्हणजे शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला हे तर त्याहून अधिक आश्चर्यकारक म्हणावे लागेल.

पंकजा मुंडे माझ्या नेत्याच..

पंकजा मुंडे यांच्यावर ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी कुरघोडी करतो, किंवा स्वंतत्र नेतृत्व निर्माण करतोय या आरोपांचे खंडण सुरेश धस यांनी केले आहे. पंकजा मुंडे या आता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव झाल्या आहेत, त्याच माझ्या नेत्या आहेत. आज त्यांच्यामुळेच मी आमदार आहे, त्यांनीच मला उमेदवारी दिली होती. निवडूण आणण्यासाठी मदत केली. भाजपमध्ये देखील मी त्यांच्यामुळेच आलो होतो. कुठलीही अट न घालता, उलट जिल्हा परिषदेला माझ्या गटाचे पाच सदस्य देऊन तुम्हाला पाहिजे तो अध्यक्ष करा, असे मी म्हणालो होतो, याची आठवण धस यांनी यावेळी करून दिली.

माझा पंकजा मुंडे यांच्याशी अजूनही संवाद आहे, ऊसतोड कामागरांचे आंदोलन आणि राज्यभरातील दौरे या दरम्यान देखील माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते. कोरोना संकटानंतर नऊ महिन्यांनी त्या जिल्ह्यात आल्या तेव्हा त्याचे स्वागत करणारा मेसेज देखील मी पाठवला होता. नजीकच्या काळात माझे त्यांचे बोलणे नसले तरी संधी मिळेल तेव्हा मी त्यांच्याशी बोलेन, असेही धस यांनी स्पष्ट केले.

फेब्रुवारीत फडावर आंदोलन..

ऊसतोड मजुर, मुकादम, वाहतुकदारांना जी वाढ साखर संघाच्या बैठकीत जाहीर करण्यात आली आहे. त्याने ऊसतोड संघटना, मजुर, मुकादम देशोधडीला लागणार आहेत. जगाच्या पाठीवर एवढी कमी मजुरी कुणालच मिळत नसेल. आज जो संप मागे घेण्यात आला आहे, त्यामागे केवळ ऊसतोड मजुर, मुकादमांचे संसार उघड्यावर येऊ नयेत, मजुरांची पळवापळवी होऊ नये ही कारणे आहेत. पण म्हणून आम्ही हा अन्याय सहन करणार असा अर्थ कुणीही काढू नये. फेब्रुवारी महिन्यात फडावर देखील संप होऊ शकतो हे आम्ही दाखवून देवू, असा इशाराही धस यांनी यावेळी दिला.

Edited By : Jagdish Pansare

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख