उद्धवजी याच शिवारात येऊन शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन तुम्ही विसरलात?.. - Did you forget the promise given to the farmers by coming to this Shivara instead of Uddhavji? | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धवजी याच शिवारात येऊन शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन तुम्ही विसरलात?..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

वीस दिवसांपासून या भागात पाऊस आहे, गंजी करून ठेवलेले सोयाबीन वाहून गेले, कापूस, मका, बाजरी, ज्वारी सगळीच पिक हातची गेली. सरकारकडून अजूनही मदत नाही, आम्ही दिवाळी साजरी कशी करावी, अशी व्यथा शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्या समोर मांडली.

परभणी ः उद्धवजी सोनपेठ तालुक्यातल्या निळा या शिवारात येऊनच तुम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २५ आणि ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती. पण सत्तेवर आल्यावर तुम्हाला याचा विसर पडला आहे. आता तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे अधिकार आहेत, तेव्हा तुम्ही दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देतो, शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देऊन ठिकठिकाणी पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सकाळी उस्मनाबाद, लातूर जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते परभणी जिल्ह्यात दाखल झाले. सोनपेठ तालुक्यातील निळा येथे नुकसान झालेल्या शेताची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले.

वीस दिवसांपासून या भागात पाऊस आहे, गंजी करून ठेवलेले सोयाबीन वाहून गेले, कापूस, मका, बाजरी, ज्वारी सगळीच पिक हातची गेली. सरकारकडून अजूनही मदत नाही, आम्ही दिवाळी साजरी कशी करावी, अशी व्यथा शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्या समोर मांडली.

यावेळी फडणवीसांनी तुम्हाला मदत मिळवून देण्यासाठी संघर्ष करू आणि जोपर्यंत सरकार मदत करणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. फडणवीस म्हणाले, पावसाने अनेकाची शेतजमीन खरडून गेली आहे, अनेक शेतात वीजेचे खांब पडलेले आहेत. रब्बीसाठी जमीन पुन्हा तयार करायची म्हटल तर त्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.

विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना जाचक अटी टाकून त्रास दिला जातोय. त्यांना देखील सरकारने कडक शब्दात समज देण्याची गरज आहे. आमच सरकार असतांना आम्ही ज्यांच्या पीक विमा नाही त्या शेतकऱ्यांना देखील ५० टक्के नुकसान भरपाई मिळवून दिली होती, याची आठवण देखील फडणवीसांनी करून दिली. संकट मोठे असले तरी आपण सगळे मिळून यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढू.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. केंद्र सरकारकडून राज्याला मदत मिळावी यासाठी देखील मी पाठपुरावा करत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगतिले. शेतकऱ्यांकडून यावेळी सरकारला जागं करण्यासाठी चाबूक देखील भेट देण्यात आला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख