‘वैद्यनाथ`च्या’ मदतीला धनंजय मुंडे धावले; पावणे अकरा कोटींची थकहमी मिळाली..  - Dhananjay Munde's helping hand to Pankaj's 'Vaidyanath'; got Rs 11 crore | Politics Marathi News - Sarkarnama

‘वैद्यनाथ`च्या’ मदतीला धनंजय मुंडे धावले; पावणे अकरा कोटींची थकहमी मिळाली.. 

दत्ता देशमुख
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

राज्य सरकारने दिलेल्या थक हमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासावे, थकीत बिले आणि पगार करावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावर्षी कारखाना गळीत हंगाम सुरू होऊन परिसरातील १००% उसाचे गाळप होणे गरजेचे आहे.

बीड : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी चक्क त्यांचे राजकीय विरोधक व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मदत केली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत थकहमीच्या विषयावर खुद्द धनंजय मुंडे यांनी आग्रह धरला आणि १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मिळाली.

साखर कारखानदारीवर आणि विशेषत: सहकारावर कायम पश्चिम महाराष्ट्राचीच पकड राहीलेली आहे. मराठवाड्यातही कारखाने आणि सहकारी संस्था उभारल्या पण मोजक्याच संस्था लौकिक टिकवू शकल्या. स्वत:ची राजकीय पायाभरणी ऊसतोड मजूरांचे नेते अशी करणाऱ्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनीही सहकारात पाऊल ठेवण्याचे ठरवत कारखाना उभारणीचा निर्णय घेतला. त्यात त्यांना थोरले बंधू पंडितअण्णा मुंडे यांचीही मोलाची साथ मिळाली. 

एकेकाळी त्यांनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने आशिया खंडात लौकिक मिळविला. ऊसतोड मजूरांचे नेते आणि यशस्वी कारखानदार अशी दुहेरी भूमिका दिवंगत मुंडेंनी यशस्वी करुन दाखविली. त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्याकडे कारखान्याची धुरा आहे.

मात्र, कायम दुष्काळामुळे आणि इतर काही कारणांनी हा कारखाना अडचणीत आला आहे. दरम्यान, आर्थिक अडचणीत सापडलेल्या ३२ सहकारी साखर कारखान्यांना थक हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर आला. यात वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यालाही १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी देण्याचा प्रस्ताव होता.
 
सदर हमी मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आग्रही मागणी केली हे विशेष. ऐन विधानसभा निवडणुकीत कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांकडून थकित वेतनासाठी उपोषण, एफआरपीच्या मागणीसाठी आंदोलन हे राजकीय मुद्दे तापले होते. पण, या भागातील शेतकरी, कारखान्याचे नोकर यांच्यासाठी राजकीय विरोध काहीही असला तरी संस्था टिकली तर हे घटक टिकतील अशी भुमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आणि कारखान्याच्या थकहमीसाठी आग्रह धरला.

मदतीसाठी सदैव तत्पर..

दरम्यान, दिवंगत गोपीनाथराव मुंडे व दिवंगत पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रयत्नातून वैद्यनाथ कारखान्याचा आशिया खंडात लौकीक झाला. या कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर वेतनासाठी उपोषणाची वेळ यावी, हे दुर्दैवी असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारने दिलेल्या थक हमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासावे, थकीत बिले आणि पगार करावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावर्षी कारखाना गळीत हंगाम सुरू होऊन परिसरातील १००% उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. भविष्यात कधीही वैद्यनाथ कारखान्यासंबंधी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून ती करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख