सर्वाधिक आमदार असूनही विरोधात बसावं लागलं, याची जाणीव ठेवून जिद्दीने काम करा.... - Despite being the highest number of MLAs, we had to sit in opposition | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वाधिक आमदार असूनही विरोधात बसावं लागलं, याची जाणीव ठेवून जिद्दीने काम करा....

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

थेट मतदारांशी संपर्क साधून हे मतदान भाजपच्या उमेदवाराला कसे मिळेल याची आखणी करा, असे आवाहनही बागडे यांनी केले. आपल्या बुथमधून भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळवून देण्याचा मान मिळवा, जिद्दीने कामाला लागा, असेही बागडे म्हणाले.

औरंगाबाद ः विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १०५ आमदार निवडूण आले, तरीही आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागले. प्रत्येक कार्यकर्त्याने याची जाणीव ठेवून मराठवाडा पदवीधर मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी जिद्दीने कामाला लागावे, असे आवाहन माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराला आता चांगला रंग भरला असून भाजपने ही जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आधी उमेदवारीवरून भाजपमध्ये मान-पान नाट्य रंगले, त्यानंतर काही बंडखोरांनी माघार घेतली तर काहीजणांनी आपली उमेदवारी कायम ठेवत अधिकृत उमेदवाराला अडचणीत आणले. तर जयसिंगराव गायकवाड सारख्या मराठवाड्यातील ज्येष्ठ नेत्याने थेट पक्षालाच राम राम ठोकला.

पण बंडखोरी आणि राजीनामास्त्राचा भाजप उमेदवारावर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा करत स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचारावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह भाजपचे मराठवाड्याती आमदार आणि खासदारांनी विजयासाठी कंबर कसली आहे. हरिभाऊ बागडे यांनी तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपचे सर्वाधिक आमदार निवडूण आलेले असतांना आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागले याची जाणीवच करून दिली.

पदवीधर मतदारांची यादी बूथपर्यंत पोहचवण्यात आल्याने आता थेट मतदारांशी संपर्क साधून हे मतदान भाजपच्या उमेदवाराला कसे मिळेल याची आखणी करा, असे आवाहनही बागडे यांनी केले. आपल्या बुथमधून भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळवून देण्याचा मान मिळवा, जिद्दीने कामाला लागा, असेही बागडे म्हणाले. आपल्या विरोधात तीन पक्ष एकत्र असले तरी, आपलाच उमेदवार निवडूण आणू, असा दावा देखील बागडे यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन करतांना केला.

Edited By : Jagdish Pansare

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख