बॅरेजेसचे दरवाजे वेळत न उघडल्ऱ्याने शेतीचे नूकसान, संबंधितांची चौकशी करा.. - Damage to agriculture due to untimely opening of barrage doors | Politics Marathi News - Sarkarnama

बॅरेजेसचे दरवाजे वेळत न उघडल्ऱ्याने शेतीचे नूकसान, संबंधितांची चौकशी करा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कारसा-पोहरेगाव तसेच खरोळा बॅरेजेसचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे शेतात पाणी जाऊन खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. ह्या दिरंगाई बाबत संबंधितांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत. पुढचे काही दिवस पावसाचे असल्यामुळे पाटबंधारे विभाग तसेच शेतकऱ्यांनीही दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले.
 

लातूर : मागील आठवडाभरापासून लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा, जनतेला दिलासा द्यावा असे निर्देश पालकमंत्री लातूर अमित देशमुख यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी व त्यातून नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अमित देशमुख यांनी आढावा घेतला.

औसा, निलंगा, शिरूर आनंतपाळ, उदगीर, जळकोट, देपणी, अहमदपूर रेणापूर, चाकूर, लातूर या दहाही तालुक्यातील काही गावे व परिसरात अचानक अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन व इतर पिकांची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीनची झाडावरच उगवण होत आहे. याशिवाय काही ठिकाणी नदीनाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. शेतातील माती तसेच अवजारे वाहून गेली आहेत. 

अतिवृष्टी आणि पुरामुळे  झालेल्या नुकसानीच्या संदर्भातील माहिती घेऊन देशमुख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बॅरेजमधून पाणी सोडण्यात झालेल्या दिरंगाईच्या चौकशीचे आदेशही दिले. आठ दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मांजरा, रेणा, तावरजा, तेरणा या नद्यांवर उभारलेल्या सर्वच बॅरेजमध्ये पाणी आले आहे.

कारसा-पोहरेगाव तसेच खरोळा बॅरेजेसचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे शेतात पाणी जाऊन खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. ह्या दिरंगाई बाबत संबंधितांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत. पुढचे काही दिवस पावसाचे असल्यामुळे पाटबंधारे विभाग तसेच शेतकऱ्यांनीही दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले.
 

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख