संकट मोठे आहे, त्यावर मात करूच; पण धीर सोडू नका... - The crisis is big, we must overcome it; But do not give up | Politics Marathi News - Sarkarnama

संकट मोठे आहे, त्यावर मात करूच; पण धीर सोडू नका...

अविनाश काळे
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल, सर्वोपतरी मदतीचा प्रयत्न असेल पण राज्याला कांही मर्यादा असल्याने केंद्र सरकारची मदत महत्वाची ठरेल, त्यासाठी येथील लोकप्रतिनिधीसह शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारच्या संबंधित मंत्र्याशी भेट घेऊन मदत मागितली जाईल. असेही पवार यांनी स्पष्ट केले.

उमरगा :  नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात या भागातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना वेदना देणारी आहे. अस्मानी सुलतानी संकट कोसळल्याने राज्य सरकार मदत करेल पण राज्य सरकारला कांही मर्यादा असल्याने केंद्र सरकारची मदत महत्वाची आहे, त्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे. संकट निश्चितच मोठे आहे, त्यावर एकत्रितपणे मात करूच, पण तुम्ही धीर सोडू नका, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला.

उमरगा, लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने माजी केंद्रिय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांनी रविवारी सास्तूर, राजेगाव - कवठा शिवारातील नुकसानीची पाहणी केली. दरम्यान  पवार यांनी महाप्रलंयकारी भूकंपानंतर केलेल्या मदतीमुळे आधार मिळालेल्या भूकंपग्रस्त भागात दौरा केल्याने येथील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव येथील व परिसरातील अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पवार यांनी पाहणी केली. या वेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, माजी आमदार राहुल मोटे,जीवनराव गोरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पवार यांनी सास्तूर - माकणी, राजेगाव परिसरातील तेरणा नदीकाठच्या जमिनी व पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, आपण अनेक नैसर्गिक आपत्ती पाहिल्या पण या परिसरात झालेली नैसर्गिक आपत्ति मोठी आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीचे, नदीकाठावरील बंधारे वाहून गेले आहेत, तसेच शेती पिकाचे नुकसान झाले आहे. जमिनी खरडून गेल्याने येत्या पाच - सात वर्षात जमिनी नापिकी असतील त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल, सर्वोपतरी मदतीचा प्रयत्न असेल पण राज्याला कांही मर्यादा असल्याने केंद्र सरकारची मदत महत्वाची ठरेल, त्यासाठी येथील लोकप्रतिनिधीसह शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारच्या संबंधित मंत्र्याशी भेट घेऊन मदत मागितली जाईल. असेही पवार यांनी स्पष्ट केले. आलेले संकट आणि झालेले नुकसान मोठे आहे. पण याआधीही आपण अशा संकटावर मात करून पुन्हा जोमाने उभे राहिलो आहोत. या संकटावरही आपण सगळे एकजुटीने मात करू, पण तुम्ही धीर सोडू नका, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख