कोरोना सदृश्य लक्षणे, प्रितम मुंडे दसरा मेळाव्याला गैरहजर... - Corona-like symptoms, Pritam Munde absent from Dussehra meet | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना सदृश्य लक्षणे, प्रितम मुंडे दसरा मेळाव्याला गैरहजर...

दत्ता देशमुख
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

मागच्या आठवड्यात प्रितम मुंडे यांनी बीडमध्ये काही ठिकाणी दौरे आणि शासकीय बैठकांनाही हजेरी लावली.

बीड : कोरोनासदृष्य लक्षणांमुळे सावरगाव घाट (ता. पाटोदा) या संत भगवानबाबांच्या जन्मस्थळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचे खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी कळवले आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. लक्षणे दिसताच त्यांनी तपासणी करून घेैतली असून अहवालाची प्रतिक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने दसरा मेळावा होतो. या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी भगवानभक्तीगडाची स्थापनाही केली आहे. दरम्यान, यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मेळावा होणार नसला तरी पंकजा मुंडे या ठिकाणी निवडक समर्थकांसह दर्शनाला पोचल्या आहेत.

त्या ठिकाणाहून त्या ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, यामध्ये डॉ. प्रितम मुंडे सहभागी होणार नाहीत. त्यांनी सहभागी न होण्याचे कारण फेसबुकच्या पोस्टद्वारे सांगीतले आहे. मागच्या आठवड्यात प्रितम मुंडे यांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी, महिला अत्याचाराविरोधात आंदोलन, कोविड केअर सेंटरला भेट, किसान संवाद कार्यक्रम, जिल्हा विकास समन्वय समितीची बैठक अशा विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला.

मात्र, त्यांना कोरोना सारखी काही लक्षणे दिसत असल्याने सध्या त्या घरीच आहेत. तपासणीही केली आहे. पण अद्याप अहवाल प्राप्त न झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी सारवरगावला न जाण्याचा निर्णय घेतला. आज विजयादशमी निमित्तची पुजा देखील प्रितम मुंडे यांनी एकट्यानेच घरी केली.

दरम्यान, पंकजा मुंडे सावरगांव येथील भगवान बाबांच्या जन्मस्थळी पोहचल्या असून, त्या आपल्या समर्थकांना आॅनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये स्थान मिळाल्यानंतर त्या आपल्या समर्थकांना काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख