तुळजाभवानीचे मौल्यवान दागिने व नाणी गायब : जिल्हाधिकाऱ्यांचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश - collector orders to file FIR in theft of precious ornaments and coins | Politics Marathi News - Sarkarnama

तुळजाभवानीचे मौल्यवान दागिने व नाणी गायब : जिल्हाधिकाऱ्यांचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

सुमारे ७१ नाणी आणि काही पुरातन मौल्यवान दागिने गायब असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तत्कालीन मंदिर प्रशासन अधिकारी दिलीप नाईकवाडी यास जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी मंदिर प्रशासनाच्या तहसीलदारांना दिले आहेत.

उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान दागिने आणि नाणी गायब केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुरुवारी (ता. १०) दिले आहेत.

तुळजाभवानीदेवीचे पुजारी किशोर गंगणे यांनी ९ मे २०१९ ला तक्रार दिली होती. त्यानुसार देवीचे काही मौल्यवान दागिने आणि नाणी मंदिर प्रशासनाच्या ताब्यातून गायब झाली असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी या प्रकरणात चौकशी समिती नेमली. अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने अहवाल सादर केला. यामध्ये १९८० पर्यंतही पुरातन आणि मौल्यवान दागिने मंदिर संस्थांच्या ताब्यात असल्याचे दिसून आले; मात्र त्यानंतर २००५ आणि २०१८ मध्ये या दागिन्याचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये सुमारे ७१ नाणी आणि काही पुरातन मौल्यवान दागिने गायब असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तत्कालीन मंदिर प्रशासन अधिकारी दिलीप नाईकवाडी यास जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी मंदिर प्रशासनाच्या तहसीलदारांना दिले आहेत.
-----
जगभरातील मौल्यवान दागिने
आई तुळजाभवानीच्या चरणी अनेक राजे-महाराजांनी मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. ऐतिहासिक कालखंडातील हा एक अनमोल ठेवा आहे. निजाम, औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज अशा मोठ्या घराण्यांनी देवीला दागिने दिल्याची नोंद तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडे आहे. अशा या ऐतिहासिक दागिन्यांचे मूल्य जगामध्ये कुठेही करता येत नाही. एवढे अमूल्य असे काही दागिने गायब झाले असल्याचे दिसून येत आहे. तसेच ७१ नाणीही ताब्यातून गायब झाली आहेत.
----
गुन्हा नोंद होईल?
अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौकशीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मुधोळ- मुंडे यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र देऊनही गुन्हा नोंद झाला नाही. पोलिस प्रशासनाकडून पत्रकबाजी करण्यात आली. त्यामुळे आता तरी या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
----
सूत्रधार कोण?
देवीचे मौल्यवान दागिने कुठे गेले? कोणी विकत घेतली आणि कधी हा प्रकार घडला याची चौकशी होऊन संबंधित खरा सूत्रधारपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाने डोळसपणे चौकशी करणे गरजेचे आहे. पोलिसांच्या चौकशीत खरे सूत्रधार कोण आहेत. याचा उलगडा व्हावा, अशी अपेक्षा देवीच्या भक्तांमधून व्यक्त होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख