उस्मानाबाद ः कोरोना आणि लॉकडाउनमुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन सध्या सुरू हे. ३१ डिसेंबरनंतर जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक होणार असल्याची शक्यता सहकार विभागाकडून व्यक्त होत आहे. त्यासंबंधी हालचालीसुद्धा दिसत आहे. टप्प्याटप्प्याने या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
जिल्ह्याचा विचार केला तर अ, ब, क व ड या चारही श्रेणीतील एकूण एक हजार ६० संस्थांच्या निवडणुका घेणे अपेक्षित आहे. यामध्ये अ गटाच्या चार महत्त्वाच्या संस्थांचा समावेश आहे. जिल्हा सहकारी बँकेचीही निवडणूक या टप्प्यामध्ये होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत असल्याने सहकारी संस्थानी देखील त्यांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकी अगोदर की नंतर याचा निर्णय अजून झालेला नाही. मात्र, २०२१ च्या सुरवातीलाच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असे दिसते आहे. साहजिकच पुढील महिन्यापासून जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापणार आहे.
जिल्ह्यामध्ये अ गटाच्या चार, ब गटाच्या ३६३, क गटाच्या २२० तर ड गटाच्या ४७३ सहकारी संस्थांची निवडणूक बाकी आहे. त्यामध्ये कोणत्या गटाच्या निवडणुका पहिल्यांदा घेतल्या जाणार, त्याचे टप्पे याबाबत देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. या अगोदर सहकारी संस्थांच्या निवडणुका चार वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
त्यानंतर कोरोनाची साथ आल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. त्या काळात निवडणुका घेणे शक्य नसल्याने १७ मार्चला पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला होता. त्याच अनुषंगाने दोन वेळा निवडणुकांना मुदतवाढ मिळाली होती. आता मात्र कोरोनाचे सावट काही अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Edited By : Jagdish Pansare

