महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्यासाठी मुख्यमंत्री ऑनलाईन सभा, बैठक घेणार - The CM will hold an online meeting for Satish Chavan of Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्यासाठी मुख्यमंत्री ऑनलाईन सभा, बैठक घेणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

ही प्रचार सभा आभासी पद्धतीने होणार असून मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही सभा ऐकली जाणार आहे. शहरातील मध्य, पुर्व, पश्चिमसह शहर व फुलंब्री विभागासाठी अनुक्रमे तापडीया नाट्य मंदिर, निराला बाझार,  हॉटेल विंडसर कॅसल सिडको, हॉटेल विट्स रेल्वे स्टेशन येथे सभा ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, (ता.२२) रविवारी झुम मिटींग व फेसबुक लाईव्हद्वारे प्रचार सभा घेणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे.  

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उतरले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी शहरासह मराठवाड्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिक जोमाने कामाला लागले असतांनाच उद्या (ता.२२) स्वतः उद्धव ठाकरे हे दुपारी साडेबारा वाजता झुम मिटिंग व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पदवीधर मतदार व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

या मिटिंग व बैठकीची माहिती आमदार अंबादास दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे. ही प्रचार सभा आभासी पद्धतीने होणार असून मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही सभा ऐकली जाणार आहे. शहरातील मध्य, पुर्व, पश्चिमसह शहर व फुलंब्री विभागासाठी अनुक्रमे तापडीया नाट्य मंदिर, निराला बाझार,  हॉटेल विंडसर कॅसल सिडको, हॉटेल विट्स रेल्वे स्टेशन येथे सभा ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व पदवीधर मतदार यांनी या सभेस आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख ,शाखा प्रमुख महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी व युवासैनिकांना या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख