औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा भाजप महायुतीने प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघावर भाजपचे यापुर्वी वर्चस्व होते, परंतु गेली बारा वर्ष हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. गेल्यावेळी भाजपचा या मतदारसंघात थोडक्यात पराभव झाला. यावेळी ही जागा खेचून आणायचीच या निर्धाराने भाजपचे अनके दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी राज्य व मराठवाड्यातील सर्वच नेते,लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतःला झोकून दिले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आशिष शेलार, अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, ओबीसी आघाडीचे श्रीकांत भारतीया, प्रशांत ठाकूर, यांच्यासह नेत्याची मोठी फौज प्रचारात उतरली आहे. बैठका, मेळावे यातून बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मते देऊन विजयी करण्याचे आवाहन या सगळ्याच मंडळीने केले आहे.
खासदार कराडांकडून भेटीगाठी..
औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीने पदवीधर मतदारांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्यावर पक्षाने भर दिला आहे. शहरातील विविध संस्था, संघटना, हाँस्पिटल, बँका, शाळा, महाविद्यालयात भाजपचे नेते भेटी देत आहेत. खासदार डाॅ. भागवत कराड यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. तेव्हा अनेक संस्था चालकांनी शिरीष बोराळकरच पुढील पदवीधर आमदार असतील असा विश्वास व्यक्त केला.
कराड यांनी शहरातील पीईएस इंजीनीयरींग महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, मिलिंद मल्टिपरपज महाविद्यालय, व त्यांच्या अंगीकृत असलेल्या विविध ठिकाणी जाऊन प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना शिरिष बोराळकर यांनाच पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रा.गजानन सानप, प्रा. शाकेर राजा, पंकज भारसाखळे, दिलीप बनकर पाटील, बबन नरवडे, प्रसाद कोरके, प्रशांत तारगे आदी उपस्थित होते.
बोराळकरांना वाढता पाठिंबा..
भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांना विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. नुकताच राष्ट्रीय घुमंतु जनजाती महासभेने त्यांना बिनर्शत पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय घुमंतु महासभाचे प्रदेश अध्यक्ष शरद राठोड हे गेल्या अनेक वर्षापासून मागस,अतिमागस जातीसाठी, तळागाळातील लोकांसाठी आहोरात्र झटत आहेत. त्यांना अनेक लोक मानतात.
विद्यमान आमदाराने सत्तेत असताना आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. भेटायला देखील वेळ देत नव्हते, असा आरोप देखील महासभेने यावेळी केला. मराठवाड्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मतदान देण्यासाठी प्रयत्न करतील,आता कुणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही, अशी ग्वाही देखील महासभेच्या वतीने देण्यात आली.
Edited By :Jagdish Pansare

