मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजप पुन्हा ताब्यात घेणारच.. - BJP will take over Marathwada graduate constituency again | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजप पुन्हा ताब्यात घेणारच..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, बेरोजगार पदवीधर अशा एक ना अनेक पदवीधरांचे अनंत प्रश्न प्रलंबित असून ते मागील बारा वर्षात सभागृहात कधी मांडले गेले नाही. त्यामुळे विनाअनुदानित, अंशतः अनुदानित किंवा अनुदानित असणाऱ्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

जालना ःमराठवाडा पदवीधर मतदारसंघ पूर्वीपासूनच भाजपच्या विचाराचा राहिला आहे. या मतदारसंघांचे प्रतिनिधित्तव करत असतांना श्रीकांत जोशी यांच्यासह अनेकांनी पदवीधरांचे प्रश्न मांडले, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मागील काळात हा मतदारसंघ आपल्या हातून थोडक्यात निसटला. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने भाजपने ही निवडणूक पुर्ण ताकदीने लढलीच नाही. यावेळी मात्र शिरीष बोराळकर यांचा विजय निश्चितपणे होईल व भाजप हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेईल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

परतूर येथे आयोजित पदवीधर मेळाव्यात दरेकर बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  महाविकास आघाडीच्या उमेदवारावर टिका करतांना दरेकर म्हणाले, दोन टर्म आमदार असल्याने पदवीधरांची बारा वर्ष मातीत झाली. पदवीधरांचा एकही प्रश्न मागील काळात विद्यमान आमदारांनी मांडला नाही. पदवीधरांना आपले प्रश्न सोडवायचे असतील तर आलेल्या संधीचा लाभ घेऊन शिरीष बोराळकर यांना विजयी करा.

पदवीधर मतदारांच्या समस्यांचा अभ्यास न करता मागील बारा वर्षापासून विद्यमान आमदार सातत्याने अपयशी ठरले आहेत. शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, बेरोजगार पदवीधर अशा एक ना अनेक पदवीधरांचे अनंत प्रश्न प्रलंबित असून ते मागील बारा वर्षात सभागृहात कधी मांडले गेले नाही. त्यामुळे विनाअनुदानित, अंशतः अनुदानित किंवा अनुदानित असणाऱ्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 

२००५ पूर्वी नियुक्त विराम अनुदान अंशतः अनुदान कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न अद्याप विधान परिषदेच्या पटलावर मांडलेला नाही. शाळेचे अनुदान,वेतनश्रेणी, पेन्शन योजना, अनुदानाचा प्रश्न सर्वच स्तरावर शिक्षकांच्या दृष्टीने विद्यमान आमदार अपयशी ठरले असल्याची टिकाही दरेकर यांनी केली.

एक संधी द्या, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- बोराळकर

मागील बारा वर्षात पदवीधरांची कोणतेच प्रश्न सुटलेले नाही. केवळ निवडणुकीच्या वेळेला साम-दाम-दंड-भेद वापरणारा उमेदवार निवडून द्यायचा की पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार,याचा विचार पदवीधर मतदारांनी करावा. पदवीधरांनी विश्वास टाकल्यास त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही शिरीष बोराळकर  यांनी यावेळी बोलतांना दिली. 

 कुणीही जातीपातीच्या किंवा साम-दाम-दंड-भेदाच्या राजकारणाला बळी न पडता समंजसपणे, सद्सद्विवेक बुद्धीने,मतदान करून मला सेवेची संधी द्यावी. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील, असा विश्वास देखील बोराळकर यांनी यावेळी उपस्थितांंना दिला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख