भाजप आमदाराने पालकमंत्र्यासमोर रखडलेल्या कामांसाठी धरला आग्रह ..

पाणीपुरवठा योजनेसाठी सरकारकडे निधी नसल्यास, त्याचे 3 टप्पे करावेत व त्यातील पहिल्या टप्प्यात पैठण ते औरंगाबाद शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकावी, दुसऱ्या टप्प्यात शहरातील अंतर्गत पाईपलाईन करावी व तिसऱ्या टप्यात पाण्याच्या टाक्या उभारण्यात याव्यात.
Mla atul save dpdc meeting news
Mla atul save dpdc meeting news

औरंगाबाद ः भाजपचे आमदार अतुल सावे यांनी शहरासाठी मंजुर झालेल्या १६८० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेसह रखडलेल्या विविध कामांना गती देण्यासाठी आग्रह धरला. पाणी पुरवठा योजना तातडीने पुर्ण होणे आवश्यक असल्याचे सांगत हा विषय मंत्रीमंडळ बैठकीत मांडून तो मार्गी लावावा, अशी मागणी सावे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. 

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज डीपीडीसीची बैठक पार पडली. कोरोना संकटामुळे सध्या विकासकामे निधी अभावी मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. त्यामुळे सहाजिकच बैठकीत लोकप्रतिनिधींनी त्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधत ती मार्गी लावण्याची मागणी लावून धरली. भाजपचे आमदार अतुल सावे यात आघाडीवर होते. औरंगाबाद शहराच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवून नागरिकांना दररोज पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मंजुर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचा आढावा प्रामुख्याने बैठकीत घेण्यात आला.

अतुल सावे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी १६८० कोटीची योजना मंजुर केली होती. परंतु दुर्दैवाने या योजनेसाठी विद्यमान सरकारकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देऊन टाळाटाळ होत आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना रखडल्यामुळे पाऊस भरपूर पडूनही नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

ही योजना लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी हा विषय कॅबिनेट मीटिंगमध्ये मांडावा. पाणीपुरवठा योजनेसाठी सरकारकडे निधी नसल्यास, त्याचे 3 टप्पे करावेत व त्यातील पहिल्या टप्प्यात पैठण ते औरंगाबाद शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकावी, दुसऱ्या टप्प्यात शहरातील अंतर्गत पाईपलाईन करावी व तिसऱ्या टप्यात पाण्याच्या टाक्या उभारण्यात याव्यात.

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी १५० कोटी रुपये राज्य सरकारने दिले असून, त्यातील काही रस्ते एमआयडीसी, एमएसआरडीसी तर काही महापालिका करणार होती. पण सध्या फक्त एमआयडीसीच्या रस्त्यांची कोमे सुरू आहेत. त्यातही अडथळा ठरणारे ड्रेनेजचे चेंबर, पाण्याच्या पाईपलाईन किंवा इतर दूर करण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच रस्ते विकास महामंडळ व मनपा मार्फत करण्यात येणारी कामे अद्यापपर्यंत सुरूच झालेली नसल्याचे सावे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

खड्यात गेलेल्या रस्त्यासाठी निधी द्या..

शहरातील काही रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पाऊस जास्त झाल्याने रस्ते अक्षरशः खड्यात गेले आहेत. अशा रस्त्यावर तातडीने पॅचवर्क करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळणे गरजेचे आहे, त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. काही रस्त्यांना चार वर्षापुर्वी निधी मिळाला, कामही सुरू झाले, पण रस्त्यात असलेले वीजेचे खांब हटवण्यात न आल्याने कामाला ब्रेक लागला आहे.

विशेष म्हणजे वीजे खांब हटवण्यासाठी १५ कोटींचा निधी देखील देण्यात आलेला आहे. महावितरणला वारंवार सांगून, लेखी पत्र पाठवून देखील पोल शिफ्ट केले जात नाही, अशी तक्रार दखील सावे यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com