राष्ट्रीय सचिवपदी बढती देत भाजप नेत्यांनी विजया रहाटकरांवर पुन्‍हा दाखवला विश्वास..

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून रहाटकर यांनी देशभरात फिरून महिलांचे मोठे जाळे निर्माण केले. लोकसभा निवडणुकीत गेल्या पाच वर्षाच्या काळात मोदी सरकारने विशेषतः महिलांसाठी केलेली कामे, तीन तलाक कायदा, विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोचवण्यात रहाटकर कमालीच्या यशस्वी ठरल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सध्याचे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना पुन्हा राष्ट्रीय कार्यकारणीत काम करण्याची संधी दिली.
vijay rahatkar as a bjp national secretray news
vijay rahatkar as a bjp national secretray news

औरंगाबाद ः एका वॉर्डाची नगरसेवक ते भाजप राष्ट्रीय महिला मोर्च्याच्या अध्यक्षा आणि आता त्यापुढे एक पाऊल टाकत राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या विजया रहाटकर यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. गेल्या अनेक वर्षापासून महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम, वाढवलेले संघटन आणि सरकारची महिला विषयींची ध्येय धोरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यात मिळवलेले यश, निवडणुकांमध्ये देशभरा दौरे करून महिलांची मोठी शक्ती निर्माण करत पक्षाच्या यशात दिलेले योगदान याची पावती या निमित्ताने रहाटकर यांना मिळाली आहे. भाजपच्या दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी विजया रहाटकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत राष्ट्रीय सचिवपदी बढती दिली आहे. मराठवाडा आणि औरंगबादकरांच्या दृष्टीने ही मोठी आणि कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.

पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर एमपीएससी परीक्षा पास होऊन उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झालेली असतांना विजया रहाटकर यांनी महिलांसाठी काम करण्याची जिद्द बाळगत राजकारणात प्रवेश केला. औरंगाबादच्या धावणी मोहल्यात राहत असतांना पाणी, कचरा, वीज अशा मुलभूत प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरूवात केली.

१९९५ च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या या कामाची दखल घेऊनच पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, पण निवडणुक लढण्याचा अनुभव नसल्याने पराभव झाला. पण पक्षाने युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. महिला मोर्चाचे अध्यक्ष पद सांभाळत असतांना २००० च्या महापालिका निवडणुकीत पक्षाने पुन्हा रहाटकरांना उमेदवारी दिली आणि रहाटकर नगरसेवक झाल्या. दोन टर्म नगरसेवक, विविध समित्यांचा अनुभव गाठीशी असल्याने पक्षाने त्यांना महापौर होण्याचा मानही दिला.

महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिला आणि महिनाभरातच रहाटकर यांना थेट राष्ट्रीय कार्यकारणीत काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सहचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.  महामंत्री स्मृती इराणी यांच्यासह देशभरातील राज्या राज्यात जाऊन महिलांचे प्रश्‍न, समस्या समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत महिलांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी केलेल्या सूचनांवर विचार होऊन महिला विषयीचे धोरण ठरवतांना त्याचा समावेश केला गेला.

२०११ मध्ये गुजरात सरकारने मिशन मंगलम अभियान राबवले,  तेव्हा रहाटकर यांच्या अनेक सूचनांची दखल घेण्यात आली होती. राष्ट्रीय निवडणूक समितीत तेव्हाच्या केवळ दोन महिलांमध्ये रहाटकर यांचा समावेश करण्यात आला होता. महिला मोर्चाची राष्ट्रीय सहचिटणीस असतांनाच भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रहाटकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. 

 राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदी भुषवले..

महिला मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवत असतांनाच  महाराष्ट्र् राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. महिला आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा राज्यातील ५५०० केसेस आयोगाकडे प्रलंबित होत्या. प्रलंबित प्रकरणे निकाली काढत पिडीत, तक्रारदार महिलेला सुनावणीसाठी मुंबईला यावे लागू नये यासाठी रहाटकर यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी‘ ही योजना सहा विभागात राबवली, पुढे आयोग प्रत्येक जिल्ह्यात नेण्याचाही प्रयत्न रहाटकरांनी केला. 

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून रहाटकर यांनी देशभरात फिरून महिलांचे मोठे जाळे निर्माण केले. लोकसभा निवडणुकीत गेल्या पाच वर्षाच्या काळात मोदी सरकारने विशेषतः महिलांसाठी केलेली कामे, तीन तलाक कायदा, विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोचवण्यात रहाटकर कमालीच्या यशस्वी ठरल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सध्याचे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना पुन्हा राष्ट्रीय कार्यकारणीत काम करण्याची संधी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com