भाजप एक परिवार, तर काॅंग्रेस फक्त गांधी परिवाराची.. - BJP is a family, while Congress is just a Gandhi family. | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप एक परिवार, तर काॅंग्रेस फक्त गांधी परिवाराची..

जगदीश पानसरे
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना आहेत, मात्र त्या पदाधिकाऱ्यांनाच माहित नाहीत, तर ते कार्यकर्त्यांना काय सांगणार? असा चिमटा देखील दानवे यांनी काढला. कोरोनाच्या काळात सगळ्याच्या हाताचे काम केले, आमचेही पगार बंद झाले, सगळं काही बंद होतं. मला काहीच काम नसल्याने मी माझ्या तालुक्यात दौरा केला आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २५ गावांमध्ये वृक्ष लागवडीची योजना आणली आहे.

औरंगाबाद ः  भारतीय जनता पार्टी हा पक्ष म्हणजे एक परिवार, कुटुंब आहे. हा पक्षा कुणा एकाचा नाही, तर सगळ्यांचा आहे. पण काॅंग्रेस फक्त एका गांधी परिवाराचा पक्ष आहे, अशी टिका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. राज्यात अमर-अकबर-अॅन्थनीचे सरकार आहे, या सरकार विरोधात एकजुटीने लढा देण्याचे आवाहन देखील दानवे यांनी केले.

भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत पार पडला. यावेळी दानवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आपल्या खास शैलीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. सरकारवर टिका करत असतांना त्यांनी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले.

रावसाहेब दानवे म्हणाले,  देशात सर्वाधिक काळ सत्ता असलेला काॅंग्रेस हा पक्ष एका परिवाराचा पक्ष म्हणून ओळखला जातो. गांधी परिवाराचा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. भाजप मात्र कुण्या एका व्यक्तीचा पक्ष नाही, तर तो सगळ्यांचा आणि एका कुटुंबा प्रमाणे आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला भाजपमध्ये निश्चितच न्याय मिळतो, पण त्यासाठी आपली योग्यता सिध्द करावी लागले. राज्यात सध्या तीन पक्षांचे अमर-अकबर-अॅन्थनीचे सरकार असल्याचा पुनरुच्चार करत या सरकारच्या विरोधात एकत्रित येण्याचे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले.

केंद्र सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना आहेत, मात्र त्या पदाधिकाऱ्यांनाच माहित नाहीत, तर ते कार्यकर्त्यांना काय सांगणार? असा चिमटा देखील दानवे यांनी काढला. कोरोनाच्या काळात सगळ्याच्या हाताचे काम केले, आमचेही पगार बंद झाले, सगळं काही बंद होतं. मला काहीच काम नसल्याने मी माझ्या तालुक्यात दौरा केला आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २५ गावांमध्ये वृक्ष लागवडीची योजना आणली आहे.

सरकार तुम्हाला झाड घेऊन जाण्यासाठी, ते लाण्यासाठी खड्डे खोदणे आणि त्याला वाढवण्यासाठी पाणी देण्यासाठी देखील पैसा देते. यातून गावातच एका कुटुंबाला दररोज पाचशे रुपये रोज मिळू शकतात. तीन वर्ष चालणारी ही योजना आहे. याची माहिती करून घेऊन जर त्या आपल्या सारख्या कार्यकर्त्यांनी गावागांवात राबवल्या तर लोकांना रोजगार मिळेल आणि आपल्या पक्षाशी हे लोक जोडले जातील. राजकारणात तुम्ही स्वतःला सिध्द केलं तरचं यश मिळेल, असा उपदेशही दानवे यांनी कार्यकर्त्यांना केला.

कार्यक्रम सुरू असतांना अनेक युवा कार्यकर्ते हे आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे पाहून हे आपलेच कार्यकर्ते आहेत का? धरून आणले, असा टोलाही दानवे यांनी लगावला. आगमी महापालिका निवडणुकीत शिवसेना- राष्ट्रवादी- काॅंग्रेस हे तीन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. तेव्हा त्यांचा नेटाने मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही दानवे यांनी यावेळी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख