बीडच्या कारागृह अधिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू.. - Beed prison superintendent dies due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

बीडच्या कारागृह अधिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू..

दत्ता देशमुख
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

कोरोना विषाणूचा फैलाव जिल्ह्यात सुरु झाल्यानंतर जिल्हा कारागृहातील काही कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडून कैद्यांची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात कारागृहातील ६५ कैद्यांना एकाच दिवशी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. दरम्यान, संजय कांबळे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

बीड ः परभणी जिल्ह्यातील व त्रिपुरा येथे कार्यरत असलेले तरुण आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे सुट्टीवर घरी आलेले असतांना त्यांचा दोन महिन्यापुर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तरुण तडफदार अधिकाऱ्यांच्या मृत्यूने संपुर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त केली गेली. ही घटना उलटत नाही तोच बीड जिल्हा कारागृहाचे अधिक्षक संजय कांबळे यांच्यावरही कोरोनाने घाला घातला. बुधवारी पहाटे उपचारा दरम्यान त्यांच्या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची योग्य ती काळजी घेत त्यांना कोरोनामुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या  कांबळे यांनाच कोरोनाने गाठल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी (ता. चार) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला जिवंत पकडल्यानंतर तुरुंगात त्याच्या सुरक्षेची जबाबदारी तेव्हा संजय कांबळें यांच्यावर होती. कसाबला फाशी होईपर्यंत त्याला सुरक्षीत ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.

कोरोना विषाणूचा फैलाव जिल्ह्यात सुरु झाल्यानंतर जिल्हा कारागृहातील काही कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडून कैद्यांची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात कारागृहातील ६५ कैद्यांना एकाच दिवशी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. दरम्यान, संजय कांबळे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

कारागृहातील ६५ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर कारागृहातच उपचार करण्यात आले. सर्वांची योग्य काळजी घेऊन  त्यांना कोरोनामुक्त करण्यात कांबळे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.  यवतमाळ जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले संजय कांबळे कवी, साहित्यीक आणि उत्कृष्ट वक्ते होते. कारागृहातही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांच्या अधारे कैद्यांच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

कांबळे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त केले जात असून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख