औरंगाबादचे खासदार बिहारच्या निवडणुक प्रचाराला, पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी.. - Aurangabad MP has given a big responsibility to Bihar's election campaign | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादचे खासदार बिहारच्या निवडणुक प्रचाराला, पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी..

जगदीश पानसरे
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

एकटी एमआयएम वीस विधानसभा मतदारसंघातून लढत आहे. सुरूवातीला असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा, दौऱ्यांना स्थानिक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे एमआयएमने इथे पुर्ण क्षमतेने लढण्यासाठी कंबर कसली आहे. चार टप्प्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या प्रचाराची संपुर्ण धुराही ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर असणार आहे.

औरंगाबाद ः बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष देखील या निवडणुकीत नशीब आजमावणार असले तरी त्याचा एकही नेता अजून बिहारमध्ये प्रचाराला गेलेले नाही. याउलट एमआयएमने मात्र गेल्या महिनाभरापासून बिहार राज्यामध्ये जोर लावला आहे. पहिल्या टप्यात पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, आता मतदानाची तारीख जवळ येत असतांना त्यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना देखील प्रचारासाठी बिहारमध्ये बोलावून घेतले आहे. कोचाधामन येथील पक्षाच्या उमेदवारासाठी इम्तियाज जलील मत मागतांना दिसले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारक विजय मिळवत राज्यातील सर्वाधिक धक्कादायक निकालीची नोंद करण्यात एमआयएमला यश आले होते. अचानक मिळालेल्या या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न इम्तियाज जलील यांनी गेल्या वर्षभरात केल्याचे दिसून आले. असदुद्दीन ओवेसी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुद्देसूद मांडणी, आक्रमक शैली आणि नागरी प्रश्नांना प्राधान्य देत इम्तियाज जलील यांनी आपली चांगली प्रतिमा मतदारसंघात निर्माण केली आहे.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत शिवसेनेच्या बालेकिल्याला हादरा दिल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून महत्वाची जबाबदारी सोपवली. केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणे असो, की मग संसदेत त्यावर भाष्य असो, यातून इम्तियाज यांनी आपली छाप पाडली. केवळ राजकीय मुद्देच नाही, तर मतदारसंघातील विकास कामांच्या मुद्यावर देखील इम्तियाज जलील संसदेत अनेकवेळा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

ओवेसींची पहिली पसंत..

बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एमआयएमनेे स्थानिक पक्षांशी युती करून या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला. एकटी एमआयएम वीस विधानसभा मतदारसंघातून लढत आहे. सुरूवातीला असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा, दौऱ्यांना स्थानिक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे एमआयएमने इथे पुर्ण क्षमतेने लढण्यासाठी कंबर कसली आहे. चार टप्प्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या प्रचाराची संपुर्ण धुराही ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर असणार आहे.

तीन दिवसांपुर्वीच ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांना बिहारमध्ये बोलावून घेत त्यांच्यावर प्रचाराची मोठी जबाबदारी सोपवली आहे. कोचाधामन विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारासाठी काॅर्नर बैठक घेतल्यानंतर आज इम्तियाज जलील यांनी सभा घेत तडाखेबंद भाषण केले. पुढील काही दिवस इम्तियाज जलील हे बिहारच्या निवडणुकीत आपल्या पक्षासाठी ओवेसींच्या खांद्याला खांदा लावून मत मागतांना दिसणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख