लोकसभेसाठी भाजपला औरंगाबादेत शोध खैरेंच्या तोडीच्या उमेदवाराचा 

औरंगाबाद :औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात भाजपकडून कुणाला रिंगणात उतरवायचे यावरून भाजपमध्ये सध्या शोध मोहीम सुरु आहे . खैरेंना तोडीस तोड उमेदवार कोण राहील याबाबत भाजपतर्फे चाचपणी सुरु आहे .
Tanwani-Khaire-Karad
Tanwani-Khaire-Karad

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून  आलेल्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात भाजपकडून कुणाला रिंगणात उतरवायचे यावरून भाजपमध्ये सध्या शोध मोहीम सुरु आहे . खैरेंना तोडीस तोड उमेदवार कोण राहील याबाबत भाजपतर्फे चाचपणी सुरु आहे . 

विधानसभेचे अध्यक्ष आणि फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे हे ज्येष्ठ नेते आहेत . त्यांना भाजपतर्फे गाळ घालण्यात आली होती पण त्यांनी आपल्याला लोकसभा लढविण्यात स्वारस्य नसल्याचे आधीच स्पष्ट केलेले आहे .

भाजपचे प्रेदश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या नावाची चर्चा सुरु असल्यावरून पत्रकारांनी विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना नुकतेच छेडले होते तेंव्हा  "कराड यांना लोकसभेची उमेदवारी मी मिळवून देतो' असे म्हणत खैरेंनी कराड यांच्यासारखा प्रतिस्पर्धी आपण किती गांभीर्याने घेते हे दाखवून दिले . 

मुंबईच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजप कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश दिल्याने भाजपमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. पण खैरेंच्या विरोधात कमला लागायचे कोणी याबाबत भाजपमध्ये संभ्रम कायम आहे  .

आगामी लोकसभा निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढणार की एनडीए म्हणून हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी भाजपने मराठवाड्यात स्वबळाची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेचे खासदार असलेल्या औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत करत उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. 

भाजपच्या अंतर्गत गोटातील  वरिष्ठ नेते  परभणी आणि औरंगाबाद या दोन लोकसभा मतदारसंघात  शिवसेना फार प्रबळ आहे हे  खाजगीत मान्य करतात . पण पक्षाचा निर्णय झालाच तर कोणाला तरी या जागा लढवाव्या लागतील हे निश्चित असल्याने तुल्यबळ उमेदवारांचा शोध सुरु आहे . 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षातून नेता आयात करता येईल का यादृष्टीनेही भाजपची टेहळणी सुरु होती पण गुजरात निवडणुकीनंतर काँग्रेसचे इच्छुक भाजपसाठी नॉट  रिचेबल झाले आहेत . 

त्यामुळे सध्या भाजपने चंद्रकांत खैरे यांना वादात ओढण्याचे डावपेच सुरु केले आहेत . खैरे यांचा तेजोभंग करून त्यांच्या भोवतीचे अपराजिततेचे कवच भेदण्याचा भाजपचा हा डाव आहे .  

त्याचाच एक भाग म्हणून महिनाभरापुर्वी कराड यांनी एका पत्रकार परिषदेत चंद्रकांत खैरे यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्यामुळे खैरे यांच्या हिटलिस्टवर असलेल्या डॉ. कराड यांना डिवचण्याची संधी खैरे यांनी हेरली.

पत्रकारांनी भाजपचे डॉ. कराड तुमच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगताच, त्यांना तिकीट हवे असेल तर मी मिळवून देतो, भाजपमध्ये माझे खूप मित्र आहेत असे म्हणत खैरेंनी त्यांची खिल्ली उडवली होती. 

डॉ. कराड यांच्या उमेदवारीच्या चर्चेतील हवा काढून आपल्याला भाजपमध्ये प्रतिस्पर्धीच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न यातून खैरे यांनी केल्याची चर्चा आहे.

खैरे यांनी अशा प्रकारे तिकीट मिळवून देण्याची केलेली भाषा डॉ. कराड यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी पलटवार करत "खैरेंनी आपल्या उमेदवारीचे काय ते पहावे, आमचा उमेदवार ठरवण्यासाठी पक्ष सक्षम आहे' असे प्रत्युत्तर दिले. 


डॉ. भागवत कराड यांची खिल्ली उडवल्यानंतर चंद्रकांत खैरे यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी देखील या वादात उडी घेतली. 'खैरे यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच ते अशी भाषा बोलत आहेत, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे ", अशी  टिका तनवाणी यांनी केली.

किशनचंद तनवाणी हे शिवसेनेतर्फे महापौर आणि विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत .विधानसभा निवडणुकीपूर्वी तनवाणी शिवसेनेतून भाजपमध्ये आले आणि औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे लढले होते . चंद्रकांत खैरे आणि तनवाणी यांच्यातील प्रेम सर्वानाच माहिती आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com