औरंगाबादेत बहुमतासह भाजपचा महापौर होणार... - In Aurangabad, BJP will be the mayor with a majority | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादेत बहुमतासह भाजपचा महापौर होणार...

जगदीश पानसरे
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आपण राबवले. लोकांची कामे आणि अडचणीच्या वेळी धावून जाण्यामुळेच राज्यात सर्वाधिक आमदार आणि केंद्रात सर्वाधिक खासदारांसह बहुमताने सत्ता आपल्याकडे आहे. याचीच पुनरावृत्ती आपल्याला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील करायची आहे, असे आवाहनही बागडे यांनी केले.

औरंगाबाद ः कोरोनाच्या काळात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक जनतेच्या मदतीसाठी धावले. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुका पाहता हेच काम जोमाने पुढे सुरु ठेवावे लागेल. लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ता आणि महापौर देखील आपलाच होईल, असा विश्वास माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.

भाजपची शहर व जिल्हा कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना हरिभाऊ बागडे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवहन केले. बागडे म्हणाले, आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताचा भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला पाहिजे, त्यासाठी आपले सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील यासाठी सगळ्यांनी कामाला लागण्याची गरज आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेणे व सोडवणे हे काम आपण केले पाहिजे.

कोरोना काळामध्ये सर्वाधिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जनतेची सेवा करत होते. गरजवंताला मदत  मग ते फुड पॅकेट, पाणी वाटप, औषधी उपलब्ध करून देणे, रक्तदान असो की इतर कोणत्याही प्रकारची मदत यात आपण अग्रेसर होतो. अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आपण राबवले. लोकांची कामे आणि अडचणीच्या वेळी धावून जाण्यामुळेच राज्यात सर्वाधिक आमदार आणि केंद्रात सर्वाधिक खासदारांसह बहुमताने सत्ता आपल्याकडे आहे. याचीच पुनरावृत्ती आपल्याला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील करायची आहे, असे आवाहनही बागडे यांनी केले.

कुणीही जबाबदारी मुक्त राहणार नाही..

भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी देखील कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात पक्षासाठी झटणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला जबाबदारी सोपवण्यात येईल, कुणीही जबाबदारी मुक्त राहणार नसल्याचे सांगतिले. भाजपची नवी टीम ही तरूण, अधिक कार्यक्षम आहे. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून सर्वांना सोबत घेण्याचे काम आगामी काळात ही टीम करणार आहे.

अनेक नवे कार्यकर्ते आपल्याशी जोडले जाणार आहेत,  अनेकांना पुढील काळामध्ये वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, कोणताही कार्यकर्ता हा जबाबदारी मुक्त राहणार नाही, असेही केणेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड,  आमदार अतुल सावे हे देखील उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख