मुंडे बहिण-भावाकडून धसांना धक्का देण्याचा प्रयत्न..

पंकजा मुंडे जिल्ह्यात नसल्याचा फायदा उचलत सुरेश धस ऊसतोड कामगारांचे नेतृत्व आपल्याकडे घेऊ पाहत असल्याने धनंजय मुंडेंनाही रुचले नाही. नऊ महिन्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे जिल्ह्यात परतल्या आणि त्यांनी धसांच्या प्रयत्नांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. पुण्यात साखर संघाच्या कार्यालयात काल शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला पंकजा मुंडे यांना निमंत्रण धाडण्यात आले. पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यभरात दौरे करून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या सुरेश धसांना मात्र या बैठकीला बोलावण्यात आले नाही.
pankaja, dhas and dhnanjay mundes news
pankaja, dhas and dhnanjay mundes news

औरंगाबाद ः  मी काही लेचापेचा, आंडू-पांडू नाही, असे म्हणत भाजपचे आमदार आणि ऊसतोड मुकादम संघटनचे अध्यक्ष सुरेश धस यांनी पुण्यातील साखर संघाच्या बैठकीत येऊ न दिल्याबद्दल संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगार, वाहतुकदार, मुकादम यांच्या दरवाढी संदर्भात बैठक पार पडली. पण गेल्या महिनाभरापासून राज्यात दौरे करून आंदोलनाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणाऱ्या सुरेश धसांनाच या बैठकीपासून रोखण्याचा प्रयत्न झाला. अर्थात बीड जिल्ह्यातील दोन नेत्यांनी तो केल्याचा आरोप धसांनी केला.

अखेर पवारांच्या मध्यस्थीनंतर धसांना बैठकीत येऊन आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. पण हा आपला अपमान असल्याचे म्हणत धसांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. बीडचे ते दोन नेते म्हणजे सध्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहिण-भाऊ असल्याचे संकेत खुद्द धस यांनीच दिले आहेत. या दोन बहिण-भावांनीच आता ऊसताेड कामगारांचा जिल्ह्यात नवा नेता निर्माण होऊन नये यासाठी सोयीस्कररित्या धसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केल्याचे कालच्या प्रकारावरून स्पष्ट होते.

गेल्या काही महिन्यांपासून ऊसतोड मजुर, मदुकाम, वाहतूकदार यांचा दरवाढीवरून संप, आंदोलन सुरू आहे. ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडमध्ये या ऊसतोड मजुरांचे नेतृत्व आधी दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे आले. कोरोना संकटाच्या काळात राज्यभरातील साखर कारखान्यात अडकून पडलेल्या हजारो ऊसतोड मजुरांना आपापल्या घरी पोहचता यावे यासाठी राज्य सरकारमधील मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी तर ऊसतोड मजुरांच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांनी मुंबईत बसून प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. आता ऊसतोड मजुरांना त्यांच्या घरी पोचवण्यात कुणाची भूमिका महत्वाची होती यावरून देखील मुंडे-बहिण भावांमध्ये मध्यंतरीच्या काळात कुरघोडीचे राजकारण झाले, आणि अजूनही सुरू आहे.

धसांचा धसका...

दरम्यानच्या काळात पंकजा मुंडे यांना ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय विरोधक असलेल्या धनंजय मुंडे यांना एकीकडे तोंड द्यावे लागत असतांनाच, स्वपक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यामुळेही त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. परळी विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट यामुळे पंकजा मुंडे या गेली नऊ महिने जिल्ह्यात आल्याच नव्हत्या. मुंबईतूनच त्यांनी जिल्ह्यातील राजकीय सुत्रे हाताळली. पण भाजपमधील विरोधकांनी याचा पुरेपूर लाभ उठवत ऊसतोड कामगारांचे आंदोलन आणि त्यांच्या प्रश्नावरून राज्यभरात रान उठवण्याची जबाबदारी सुरेश धस यांच्यावर सोपवली.

धस यांनी चालून आलेली ही संधी दवडली असती तर नवलच. त्यांनीही नेत्यांचा आदेश शिरसावंद्य मानत राज्यभरात दौरे करत ऊसतोड कामगारांचे आंदोलन कसे पेटते राहील याची काळजी घेतली. एवढेच नाही तर कोरोना संकटाच्या काळात ऊसतोड कामगारांसाठी रस्त्यावर उतरून गुन्हेही झेलले. निश्चितच या सगळ्यामुळे सुरेश धस यांची जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली. बीड- उस्मानाबाद- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडी, धनंजय मुंडे यांची झालेली अडचण आणि या सगळ्यामध्ये सुरेश धस यांनी मिळवलेला विजय यामुळे धस आणि धनंजय मुंडे यांच्यातील वैर अधिकच बळावले होते.

त्यात पंकजा मुंडे जिल्ह्यात नसल्याचा फायदा उचलत सुरेश धस ऊसतोड कामगारांचे नेतृत्व आपल्याकडे घेऊ पाहत असल्याने धनंजय मुंडेंनाही रुचले नाही. नऊ महिन्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे जिल्ह्यात परतल्या आणि त्यांनी धसांच्या प्रयत्नांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. पुण्यात साखर संघाच्या कार्यालयात काल शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला पंकजा मुंडे यांना निमंत्रण धाडण्यात आले. पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यभरात दौरे करून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या सुरेश धसांना मात्र या बैठकीला बोलावण्यात आले नाही. धस यांना धक्का देण्याची ही खेळी मुंडे बहिण-भावांनी एकत्रितपणे केल्याचा आरोप धसांनी नाव न घेता केला आहे.

ऐरवी एकमेकांवर टिका करण्याची आणि कुरघोडीची संधी न दवडणारे धनंजय आणि पंकजा मुंडे साखर संघाच्या बैठीकत मात्र एकत्रित आणि शेजारी शेजारी बसलेले दिसले.एवढेच नाही तर त्यांच्यात संवाद आणि हास्यविनोद झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे या दोघांनी मिळूनच धस यांना साखर संघाच्या बैठकीला येण्यापासून सुरूवातीला रोखले या आरोपाला पुष्टी मिळते. पण धनंजय मुंडे यांच्या सोबत झालेला संवाद आणि हास्य विनोद यातून आपल्या समर्थकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये, याची काळजी घेत पंकजा मुंडे यांनी बैठक संपवून बाहेर पडताच प्रसारमाध्यमांशी बोलतांना आम्ही एकमेकांशी बोललो असलो तरी आमच्यातील राजकीय वैर किंवा मतभेद संपले, असा कुणी अर्थ काढू नये असेही स्पष्ट केले.

तर दुसरीकडे धस यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांना कुणी बैठकीला बोलावले होते की नाही, मला माहित नाही, मला मात्र निमंत्रण होते, असे सांगत धस यांना आपण महत्व देत नसल्याचे दाखवून दिले होते. एकंदरित ऊसतोड कामगारांचे नेतृत्व कुणाकडे यासाठीचा संघर्ष भविष्यात आणखी पेटणार एवढे मात्र निश्चित. तुर्तास मुंडे बहिण-भावाने सुरेश धस यांना धक्का दिल्याचे दिसून आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com