गोळीबार करत बांधकाम व्यवासायिकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण.. - Attempt to kidnap builder by firing, but .. | Politics Marathi News - Sarkarnama

गोळीबार करत बांधकाम व्यवासायिकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

नाजीम यांना या आरोपींनी बळजबरीने गाडीत ओढले. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीपैकी एकाने गोळीबार केला, यात नाजीमच्या डाव्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. अपहरण केल्यानंतर आरोपींनी नाजीमला चितेगाव-आपतगावकडे नेले. पण अचनाक कारमधील डिझेल संपले आणि आरोपींनी कार आणि जखमी नाजीमला तिथेच सोडून पळ काढला.

औरंगाबाद ः शहराला लागून असलेल्या सातारा परिसरात आज एक थरारक घटना घडली. अज्ञात तीन- ते चार जणांनी हवेत गोळीबार करत एका बांधकाम व्यवायिकाचे अपहरण केले. पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या या आरोपींनी या व्यवायिकाला गाडीत बसवत धूम ठोकली. यावेळी झालेल्या झटापटीत बांधकाम व्यवसायिकाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला आहे. परंतु कारमधील डिझेल संपल्यामुळे आरोपींनी गाडी व जखमी बांधकाम व्यवसायिकाला जागेवर सोडून पळ काढला. 

गोळीबार करत अपहरण करण्याचा प्रकार घडकीस आला आणि पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. हुसैन कॉलनी येथील रहीवाशी नाजीम रऊफ पठाण, (वय-३४)  या तरुण बांधकाम व्यवासायिकाच्या अपहरणाचा प्रयत्न आज साडेअकराच्या सुमारास पीडब्लूडी काॅलनीत झाला. शाहनूरमिया दर्गा उड्डाणपूलाजवळील एका बांधकाम ठिकाणावर मजुरांना सूचना देत असतांना एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून तीन-चार जण घटनास्थळी आले.

नाजीम यांना या आरोपींनी बळजबरीने गाडीत ओढले. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीपैकी एकाने गोळीबार केला, यात नाजीमच्या डाव्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. अपहरण केल्यानंतर आरोपींनी नाजीमला चितेगाव-आपतगावकडे नेले. पण अचनाक कारमधील डिझेल संपले आणि आरोपींनी कार आणि जखमी नाजीमला तिथेच सोडून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.

तेव्हा पोलिसांना तिथे इंडिगो गाडी सापडली. नाजीम हा देखील गाडीत जखमी अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी त्यास तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. जुन्या वादातून हा अपहरणाचा प्रकार घडल्याचे बोलले जाते. या घटनेत आरोपींकडून गोळीबार करण्यात आल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस अपहरणकर्त्यांचा कसून शोध घेत आहेत. 

दरम्यान, जखमी नाजीम याच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. पुढील तपास सातारा पोलीस करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख