अशोक चव्हाण म्हणतात, न्यायालयात मी नाही, तर ज्येष्ठ विधीज्ञ बाजू मांडतात.. - Ashok Chavan said, "I am not in the court, but senior legislators are defending. | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक चव्हाण म्हणतात, न्यायालयात मी नाही, तर ज्येष्ठ विधीज्ञ बाजू मांडतात..

उमेश वाघमारे
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

मराठा आरक्षणाचे एवढे गांभीर्य आहे, तर चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका का दाखल केली नाही? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित करत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

जालना ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून काही जण राजकारण करत आहेत. परंतु, न्यायालयात बाजू मांडण्यासाठी मी जात नाही, तर सिनीअर काऊन्सील हे बाजू मांडतात. मी मराठा आरक्षणाचे काम प्रामाणीकपणे करतो आहे. जर मुख्यमंत्र्यांना वाटले, की हे काम माझ्यापेक्षा दुसरा कोणी अधिक चांगले करू शकेल, तर त्याला ते द्यावे, माझी काहीही हरकत असणार नाही. पण मराठा समाजाचा एक सहाकारी म्हणून माझे काम सुरू ठेवेन, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करत आपल्यावर होणाऱ्या टिके बद्दल नाराजी व्यक्त केली.

जालना येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा व काॅंग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याच्या संदर्भात स्वाक्षरी व जनजागृती मोहिमेबद्दलही चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाचे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे. मराठा आरक्षण रद्द झालेले नाही, त्याला सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. ती स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालायात युक्तीवाद करावा लागणार आहे. त्यासाठी घटनापीठ स्थापन करण्यासाठी सर न्यायाधीश यांच्याकडे लेख अर्ज सरकारने यापुर्वीच  केलेला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी ही घटनापीठाकडे व्हावी अशी राज्य शासनाची भूमिका आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या बेंचने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, त्याच बेंचसमोर जाऊन मराठा आरक्षणाची स्थगिती उठविण्याची मागणी करणे उचित नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाची स्थापन करावी, अशी मागणी ७ आॅक्टोबर रोजी सर न्यायाधीश यांच्याकडे लेखी स्वारूपात केली आहे. राज्य शासन मराठा आरक्षणावर गांभीर्यांने काम करत आहे,. मात्र, काही जण यावर राजकारण करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.

मराठा आरक्षणाचे एवढे गांभीर्य आहे, तर चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका का दाखल केली नाही? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित करत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. इतर नऊ ते दहा संघटनांनीही मराठा आरक्षणासंदर्भात हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया आहे, एका मर्यादेच्या पुढे जाता येत नाही, असे स्पष्ट करत मी उपसमीतीचा अध्यक्ष म्हणून प्रामाणिक काम करत असल्याचा पुनरुच्चारही अशोक चव्हाण यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख