अर्णबची भाषा पत्रकारितेला न शोभणारी; पण सरकारकडूनही सुडाचे राजकारण... - Arnab's language does not suit journalism; But even the politics of the government | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णबची भाषा पत्रकारितेला न शोभणारी; पण सरकारकडूनही सुडाचे राजकारण...

जगदीश पानसरे
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

देशात किंवा राज्यात जर पत्रकारांवर हल्ला किंवा पोलिसांकडून चुकीची कारवाई झाली, तर सगळे पत्रकार रस्त्यावर उतरत होते. अर्णब प्रकरणात असे चित्र दिसले नाही. अशी वेळ पत्रकारांवर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची आणि आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

औरंगाबाद ः अर्णब गोस्वामी यांच्यावर २०१८ मधील जुन्या प्रकरणावरून झालेली कारवाई हा राजकीय सुडाचा भाग आहे. सत्तेचा अशा प्रकारे गैरवापर होत असेल तर तो सत्ता बदल झाला की तुमच्या विरोधकांकडून देखील केला जाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे असा पायंडा राज्यात आणि देशात पडणे हे लोकशाहीला मारक आहे. दुसरीकडे अर्णब गोस्वामी यांनी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या प्रकारची भाषा राज्याचे मुख्यमंत्री किंवा एका दैनिकाचे संपादक असलेल्या संजय राऊत यांच्याबद्दल वापरली त्याला पत्रकारिता म्हणत नाहीत, अशा शब्दांत पुर्वाश्रमीचे पत्रकार आणि आताचे खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी चौदा दिवसांचा दौरा करून आल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक आणि त्यासाठी राज्य सरकारने २०१८ मधील ज्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचे कारण दिले यावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले. सरकारनामाशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, गेल्या काही वर्षात विविध चॅनेलच्या संपादक आणि अॅंकरची भाषा बघितली तर हीच पत्रकारिता आहे का? असा प्रश्न वीस बावीस वर्ष पत्रकारिता केलेल्या माझ्या सारख्याला देखील पडतो. अर्णब गोस्वामी व त्यांच्या सारख्या काही हिंदी भाषिक वाहिन्यांवरील संपादक आणि पत्रकारांची भाषा पाहिली तर ती एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या सारखी वाटावी अशीच आहे.

अर्णब गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात एका चॅनेलचे संपादक म्हणून जे विषेय मांडले, चर्चासत्र भरवले ते पाहता ते भाजपचा अंजेडा घेऊन चाललेत की काय? असेच वाटत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केलेला एकेरी उल्लेख, ए संजय राऊत ची भाषा ही पत्रकारितेला शोभणारी निश्चितच नव्हती. एखाद्या अभिनेत्याच्या आत्महत्येवरून रात्रंदिवस डिबेट करणे, चॅनेलच्या माध्यमातून आरोपांची राळ उठवणे हे पत्रकारितेचे लक्षण निश्चित नाही. अर्णब आणि त्यांच्या सारखा इतर काही चॅनेलने कधी देशातील शेतकरी, त्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी या सारखे प्रश्न घेऊन चर्चा सत्र भरवले होते का? 

मग पत्रकारितेच्या नावाखाली आरडाओरड, कुणाच्या तरी नवाचा एकेरी उल्लेख, उद्धार हीच जर पत्रकारिता असेल तर यापुढचा काळ अजून कठीण असेल, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला. या आधी देशात किंवा राज्यात जर पत्रकारांवर हल्ला किंवा पोलिसांकडून चुकीची कारवाई झाली, तर सगळे पत्रकार रस्त्यावर उतरत होते. अर्णब प्रकरणात असे चित्र दिसले नाही. अशी वेळ पत्रकारांवर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची आणि आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. अर्णब यांना जर एखाद्या पक्षाची तळी उचलायचीच असेल तर त्यांनी पत्रकारिता सोडून हवा तो राजकीय पक्ष निवडावा आणि त्यात प्रवेश करावा, असा टोलाही इम्तियाज यांनी लगावला.

भाजपला पत्रकारांचा पुळका कसा?

अर्णब गोस्वामींना अटक झाल्यानंतर कुठलीही पत्रकार संघटना रस्त्यावर उतरली नाही, पण भाजपचे कार्यकर्ते मात्र या अटकेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या याचे आश्चर्य वाटले. जणू काही अटक झालेला अर्णब हा भाजपचा कार्यकर्ताच होता, असे चित्र राज्यभरात पहायला मिळाले. मग कोरोनामुळे पत्रकारिता करतांना देशात आणि राज्यात जेव्हा अनेक पत्रकारांचे बळी गेले तेव्हा भाजपचे लोक कुठे होते. तेव्हा का कुणी रस्त्यावर उतरले नाही,  असा सवाल देखील इम्तियाज यांनी  उपस्थित केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख