कृषी मंत्र्यांचा मराठवाडा दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार का? - Agriculture Minister's visit to Marathwada, will farmers get immediate help? | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी मंत्र्यांचा मराठवाडा दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार का?

जगदीश पानसरे
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्र्यांनी सरकारकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून पंचनाम्यांची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने आता पंचनाम्यांचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे कृषीमंत्री दादा भुसे यांचा मराठवाडा दौरा महत्वाचा मानला जातो आहे.

औरंगाबाद ः कृषी मंत्री दादा भुसे हे आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. राज्यासह मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील शेती, फळबागा व पिकांच्या नुकसानीची पाहणी ते करणार आहेत. या शिवाय प्रत्येक जिल्ह्यात कृषी विषयक आढावा बैठक देखील घेण्यात येणार आहे.

राज्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जूनच्या सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी होता, शेतातील पिकं देखील चांगलीच बहरली होती. पण गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटी झाल्याने शेतातील पिके अक्षरशः पाण्यात बुडाल्याची परिस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्र्यांनी सरकारकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून पंचनाम्यांची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने आता पंचनाम्यांचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे कृषीमंत्री दादा भुसे यांचा मराठवाडा दौरा महत्वाचा मानला जातो आहे.

कृषीमंत्री भुसे आज सकाळी सात वाजता मालेगावहून अकरा वाजता औरंगाबादला येणार आहेत. आल्याबरोबर ते आधी शेत पिक, फळबागा व जमीनीचे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुर आणि अतिवृष्टीमुळे झाले्ल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

औरंगाबाद येथील बैठक संपल्यानंतर दुपारी जालना जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी आणि आढावा घेतल्यानंतर सायंकाळी ते हिंगोली जिल्ह्यात जाणार आहेत. तिथे सायंकाळी साडेसात वाजता आढावा बैठक घेऊन तिथेच मुक्काम करणार आहेत.

रविवारी पुन्हा सकाळी सात वाजेपासून हिंगोली जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून आढावा बैठक घेतील. त्यानंतर परभणी, लातूर आणि सांयकाळी साडेसात वाजता उस्मानाब जिल्ह्यातील तुळजापूर येथे ते पिक पाहणी आणि आढावा बैठक घेतील. त्यानंतर सोलापूर मार्गे मुंबईला रवाना होऊन त्यांचा मराठावाडा दौरा संपेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख