युवक काॅंग्रेसचे सुपर सिक्सटी नंतर, आता सुपर वन थाऊजंड.. - After the Youth Congress' Super Sixty, now Super One Thousand .. | Politics Marathi News - Sarkarnama

युवक काॅंग्रेसचे सुपर सिक्सटी नंतर, आता सुपर वन थाऊजंड..

जगदीश पानसरे
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

आम्ही युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना एक सक्षम उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी तयार करणार आहोत. नागरी प्रश्न, त्याची सोडवणूक कशी करायची, जिल्हा, राज्य पातळीवरचे प्रश्न, सरकारच्या योजना याची माहिती आणि सोशल मिडियाचे सखोल ज्ञान आदी गोष्टी या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही या तरुणांना शिकवणार आहोत. त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद ः विधानसभा निवडणुकीत सुपर सिक्सटीचा उपक्रम राबवत राज्यातील साठ विधानसभा मतदारंसघात युवक काॅंग्रेसने मोहिम राबवली होती. आता येत्या वर्षभरात राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युवकांना प्राधान्य देण्यासाठी प्रदेश युवक काॅंग्रेसच्या वतीने सुपर वन थाऊजंड हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली. युवक काॅंग्रेसच्या बैठकीसाठी तांबे औरंगाबादेत आले होते.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद व अन्य काही महापालिका व ग्रामपंचयतीच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पुढील वर्षात राज्यभरात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर युवक काॅंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.

या संदर्भात `सरकारनामा`शी बोलतांना सत्यजीत तांबे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत किमान चाळीस मतदारसंघात युवक काॅंग्रेसच्या माध्यमातून तरुणांना उमेदवारी देण्याचा माझा संकल्प होता. पण प्रत्यक्षात जेव्हा त्या दृष्टीने आढावा घेतला तर विधानसभा निवडणुक लढवण्या इतपत तयारी किंवा जनसंपर्क असणारे युवक कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे इच्छा असून देखील आम्हाला तरूणांना संधी देता आली नाही. येत्या वर्षभरात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुन्हा ही अडचण येऊ नये यासाठी आम्ही सुपर वन थाऊजंड ही मोहिम हाती घेतली आहे.

या अतंर्गत आम्ही युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना एक सक्षम उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी तयार करणार आहोत. नागरी प्रश्न, त्याची सोडवणूक कशी करायची, जिल्हा, राज्य पातळीवरचे प्रश्न, सरकारच्या योजना याची माहिती आणि सोशल मिडियाचे सखोल ज्ञान आदी गोष्टी या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही या तरुणांना शिकवणार आहोत. त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही निवडक साठ विधानसभा निवडणुकीची जबाबदारी घेतली होती. सुपर सिक्स्टीला मिळालेले यश पाहता आमचा हा नवा उपक्रम देखील निश्चिचत यशस्वी ठरेल आणि युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना राजकारणात चांगली संधी उपलब्ध होईल, असा मला विश्वास आहे.

महापालिकेसाठी स्वबळाची तयारी..

औरंगाबाद महापालिका निवडणुक काॅंग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर प्रत्येक राजकीय पक्ष हा आपली ताकद वाढवण्याच्या दृ्ष्टीने काम करत असतो. आम्ही देखील महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठीच काम करणार आहोत. शेवटी जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा, स्वतंत्र लढायचे की महाविकास आघाडी करून याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, आणि तो सगळ्यांनाच बंधनकारक राहील, असेही तांबे यांनी स्पष्ट केले.

युवक काॅंग्रेसकडून सध्या राज्यात केंद्राच्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात स्वाक्षरी माेहिम राबवली जात आहे. राज्यभरातून एक कोटी स्वावक्षऱ्या घेऊन त्याचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून पाच लाख स्वाक्षऱ्या मिळवण्याचे उदिष्ट ठरवण्यात आले होते.

औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला, तर आतापर्यंत आम्ही अडीच लाखाहून अधिक शेतकरी, कामगारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. येत्या आठ दिवसांत एक कोटी सह्याचे लक्ष्य आम्ही गाठू आणि केंद्राच्या या शेतकरी आणि कामगार कायद्याच्या विरोधात जनतेमध्ये किती मोठ्या प्रमाणात नाराजी आहे हे आम्ही राष्ट्रपती महोदयांच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असेही तांबे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख