शरद पवारांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री मंगळवारी तुळजापुरात येणार.. - After Sharad Pawar's visit, now the Chief Minister will come to Tuljapur on Tuesday | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री मंगळवारी तुळजापुरात येणार..

तानाजी जाधवर
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

रविवारी मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यात शरद पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. आता मुख्यमंत्री मराठवाड्यात येऊन शेतकऱ्यांना थेट मदतीची घोषणा करतात का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

उस्मानाबाद ः  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील तुळजापुर, उमरगा, औसा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मंगळवारी तुळजापुर दौऱ्यावर येत आहेत. तालुक्यातील नुकसानग्रस्त गावाना भेटी देऊन ते पाहणी करणार आहेत. 

पाच- सहा दिवसापुर्वी जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकासह, अनेक घराची पडझड होऊन संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाल्याचे चित्र आहे. नदी, ओढे बंधाऱ्या शेजारील जमीन पाण्याच्या प्रवाहाने वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शरद पवारांनी याची दखल घेत रविवारी सकाळीच तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत पाहणी केली. संकट मोठे आहे, त्यावर एकजुटीने मात करू, पण धीर सोडू नका, असे आवाहन करत पवारांनी शेतकऱ्यांना राज्य व केंद्राच्या मदतीतून सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

शरप पवारांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील २० रोजी (मंगळवारी) जिल्ह्यात येत आहेत. तुळजापुर तालुक्यातील अपसिंगा व काटगाव या दोन गावांना ते भेट देणार आहेत. सकाळी आठ वाजता मुंबईहून सोलापुर आणि तेथील दौरा संपल्यानंतर साडेनऊ वाजता ते तुळजापुरला निघणार आहेत. सव्वा दहा वाजता काटगाव (ता.तुळजापुर ) येथे येऊन तेथील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घराची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी ते करतील.

तसेच सव्वा अकरा वाजता अपसिंगा (ता.तुळजापुर) येथील पडझड झालेल्या घरासह शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन मुख्यमंत्री ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दोन गावाची परिस्थिती जाणुन घेतल्यानंतर तुळजापुर विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून जिल्ह्यात झालेल्या एकुण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.

राज्यात विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिक व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे. राज्य सरकारने पंचनाम्यांचे आदेश दिले असले तरी तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे. विरोधकांकडून देखील तशी मागणी होत आहे. अनेक भागात शेतं पाण्याखाली गेल्यामुळे सरकारकडे उपलब्ध असलेल्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

रविवारी मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यात शरद पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. आता मुख्यमंत्री मराठवाड्यात येऊन शेतकऱ्यांना थेट मदतीची घोषणा करतात का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख