खासदार धमकी प्रकरणानंतर पोलिस रिंधा गॅंगची पाळेमुळे उखडण्याच्या तयारीत.. - After the MP threat case, the police are preparing to uproot the Rindha gang | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार धमकी प्रकरणानंतर पोलिस रिंधा गॅंगची पाळेमुळे उखडण्याच्या तयारीत..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी नुकताच नांदेडमधील अशा काही व्यावसायिक, व्यापाऱ्यांशी संवाद साधला ज्यांना या आधी रिंधा गॅंगकडून खंडणीसाठी फोन किंवा धमक्या आल्या आहेत. त्यांच्याकडून काही सुगावा लागून खासदार जाधव यांना धमकी देणाऱ्याचा शोध लागतो का? असे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

परभणी ः शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जीवे मारण्याची धमकी आणि त्यासाठी दोन कोटी रुपयांची सुपारी नांदेडच्या रिंधा गॅंगला देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. ्स्वतः जाधव यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिस तपासाला आता गती आली आहे. दोन दिवसांपुर्वी नांदेडमधून एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी रिंधा गॅंगकडून याआधी ज्यांना खंडणीसाठी धमक्यांचे फोन आले, त्या सर्वांशी संवाद साधून काही धागेदोरे हाती लागतात का? या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालून रिंधा गॅंगची पाळेमुळेच उखडून फेकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

खासदार संजय जाधव यांनी आपल्याला जीवे मारण्यासाठी परभणीतील कुणी तरी नांदेडच्या रिंधा गॅंगला दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. या तक्रारीरीची दखल घेत पोलिस अधिक्षकांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमूण या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. काही दिवसांपुर्वी नांदेडमधू एका संशयिताला देखील ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून पोलिसांना काही ठोस माहिती मिळाली का? हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, नांदेडच्या ज्या हरविंदरसिंह उर्फ रिंधा गॅंगचे नाव या धमकी प्रकरणात समोर आले, त्या गॅंगच्या मुसक्या आवळण्याची जोरदार तयारी नांदेड पोलिसांनी देखील सुरू केली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी नुकताच नांदेडमधील अशा काही व्यावसायिक, व्यापाऱ्यांशी संवाद साधला ज्यांना या आधी रिंधा गॅंगकडून खंडणीसाठी फोन किंवा धमक्या आल्या आहेत. त्यांच्याकडून काही सुगावा लागून खासदार जाधव यांना धमकी देणाऱ्याचा शोध लागतो का? असे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

नांदेड शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये व्पापाऱ्यांना धमकावणे, दुकानात जाऊन धुडगूस घालणे, गोळीबार करणे अशा काही घटना घडल्या होत्या. यात देखील रिंधा गॅंगचे नाव प्रामुख्याने समोर आले होते. व्यापारी, व्यावसायिकांना धमकावणाऱ्यापैंकीच कुणी खासदार संजय जाधव यांनी जीवे मारण्याची धमकी दिली का? दोन कोटी रुपयांची सुपारी देणारी परभणीमधील ती व्यक्ती कोण? याचाही शोध या संवादाच्या माध्यमातून पोलिस घेत आहेत.

आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती खासदार जाधव यांनी मुख्य्ंमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरून दिली होती. या धमकी देणाऱ्या गॅंग आणि सुपारी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्यासाठी पोलिसांना फ्री हॅन्ड द्या, अशी विनंती देखील जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानतंर या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचे दिसत आहे. सध्या तरी पोलिसांची हाती ठोस असे काही लागलेले नाही. परंतु लवकरच या धमकी प्रकरणामागे नेमके कोण आहे? हे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख